आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election Preparedness: No Star Propogandist In State Congress

लोकसभा निवडणूक तयारी: राज्यात काँग्रेस पक्षाकडे अभाव स्टार प्रचारकांचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना राज्यातील सत्ताधारी काँग्रेसकडे मात्र ‘स्टार प्रचारकां’चा अभाव जाणवत असल्यामुळे पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मागील निवडणुकांमध्ये ती भूमिका उत्तम पार पाडली होती. पण आज ते हयात नाहीत. दुसरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटीच्या प्रकरणातून अद्याप पूर्ण दिलासा मिळालेला नाही. निवडणूक काळात दिल्लीहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी वगैरे बडे नेते प्रचारासाठी येतील. एखाद-दुसरी सभा घेतील. मात्र प्रचाराची प्रमुख जबाबदारी राज्यातील नेत्यांनाच सांभाळायची असल्याने हे ‘शिवधनुष्य’ उचलणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘राष्ट्रवादी’ची फळी मजबूत
दुसरीकडे सत्तेतील मित्रपक्ष व प्रतिस्पर्धीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे मात्र तगड्या आणि स्टार प्रचारकांची मजबूत फळी आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, अजित पवार, बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील हे नेते प्रचारसभा गाजवतील, ही भीतीही कॉँग्रेस नेत्यांना वाटत आहे.


थोरात, विखे जिल्हय़ापुरतेच
डॉ. पतंगराव कदम हे त्यांच्या भागामध्ये प्रचार करू शकतील. पण राज्यभर त्यांचा प्रभाव पडत नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे त्यांच्या जिल्ह्यापुरते र्मयादित आहेत. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे इतर नेत्यांना राज्यभर स्वीकारले जाईल याची पक्षाला खात्री नाही.

माणिकरावांना मर्यादा
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याही नेतृत्वाला र्मयादा आहेत. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील इतर नेत्यांमध्ये उद्योगमंत्री नारायण राणे, वनमंत्री पतंगराव कदम आदींचा समावेश होतो. राणे प्रचाराच्या सभा उत्तम घेऊ शकत असले तरी पक्षाच्या आदेशाशिवाय ते काही करू इच्छित नाहीत. काँग्रेसच्या सक्रिय राजकारणामध्ये ते फारसे सहभागी होत नाहीत, असे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत शंका
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र चव्हाण यांचा राज्यभर राजकीय प्रभाव पडेल का, याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना शंका वाटते. त्यांची तुलना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी होत असल्यामुळे चव्हाण स्टार प्रचारक बनू शकतील का, असा प्रश्न काँग्रेसला वाटतो.