मुंबई- सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या महाराष्ट्राच्या कन्या सुमित्रा महाजन यांचे बुधवारी विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी महाजन यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, सु्मित्रा महाजन या अत्यंत मृदू, प्रेमळ अणि आग्रही स्वभावाच्या आहेत. अनेक अडचणींवर सामना करीत त्या मध्य प्रदेशमधून राजकारणात पुढे आल्या आहेत. महिला सक्षमीकरणाकरिता हे आणखी एक पाऊल असून लोकसभेचे नवे पर्व सुरू होईल, महिलांना राजकीय न्याय मिळेल त्यामुळे राज्यातील जनतेच्या वतीने त्यांचे मी अभिनंदन करतो.
खडसे म्हणाले की, सुमित्रा महाजन यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असून सतत आठ वेळा निवडून येण्याची किमया त्यांनी साधली आहे. सभागृहाच्या कामकाजाची माहिती असल्यानेच त्यांची या पदासाठी निवड झाली असून त्या अध्यक्षपदावरून उत्कृष्ट काम करतील.