आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांच्या गजरात मुंबापुरीत ‘श्रीं’चे आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ढोल-ताशांचा आसमंत दुमदुमून टाकणारा गजर, त्याला लेझीमची साथ... संगीताच्या तालावर थिरकणारी पावले.. डोक्यावर गांधी टोपी किंवा कपाळाला बाप्पाच्या नावाची लाल पट्टी.. आणि मोरया मोरयाच्या गजरात सोमवारी सकाळपासूनच अवघी मुंबापुरी लाडक्या गणरायाच्या स्वागतात तल्लीन झाली होती. सर्वसामान्य चाकरमान्यांपासून ते ते हाय प्रोफाइल सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळींनी गणरायाचे स्वागत करताना अजिबात कसर ठेवली नाही.


रविवार सकाळपासूनच गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी मूर्ती कारखान्यांमध्ये रीघ लागली होती. रविवारी या गर्दीला अगदीच उच्चांकी स्वरूप आले. दादर, परळ आणि लालबाग या मराठीबहुल भागासह मुंबईच्या सर्वच उपनगरांमध्ये दुचाकी-चारचाकी वाहनांपासून हातगाडीपर्यंत मिळेल त्या वाहनाने गणरायाला घरी नेण्यासाठी एकच धांदल उडाली होती.


बच्चे कंपनीचा उत्साह
बच्चेकंपनीचा उत्साह तर ओसंडून वाहताना दिसत होता. दादर फूल मार्केट, रानडे रस्ता, केळकर रस्ता, लालबाग मार्केट आदी ठिकाणी मिठाईवाल्यांच्या दुकानात मोदक आणि प्रसादाचे पदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती. तशीच, फळे, फुले, दूर्वा आदी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठीदेखील झुंबड उडाली होती. रस्त्यावर उसळलेल्या गर्दीला सावरताना मोठी कुमक असूनदेखील पोलिसांना नाकी नऊ येत होते. बहुतांश घरांमध्ये सायंकाळपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना झाली बहुतांश मंडळांनी पहिल्या दिवसापासूनच देखावे खुले केले आहेत.
तसेच, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीदेखील लांबलचक रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे.


हिरेजडीत मूर्तीचे आकर्षण
लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा राजा, गौड सारस्वत ब्राह्मण मंडळाचा गणपती, अंधेरीचा राजा, गणेशगल्लीचा मुंबईचा राजा या सर्व मानाच्या मंडळांच्या गणपतींची रात्री उशिरापर्यंत वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. तीन लाख अमेरिकन हि-यांपासून बनवलेला तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा लखलखता गणपती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. भारतीय सिनेमाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीचा धावता आढावा घेणारा सह्याद्री स्टुडिओ हा देखावा सह्याद्रीनगर मंडळाने सादर केला आहे. गँगस्टर छोटा राजन याचा हा गणपती असल्याचे म्हटले जाते.


नाना, भुजबळांकडे पूजा
सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांच्या घरीदेखील गणपतीचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या घरीदेखील गणरायाची थाटात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या माहिमच्या घरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली. गणपतीकडे आपण काही मागत नाही. तोच सर्व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ देतो, अशा शब्दांत त्यांनी गणरायाबद्दल
कृतज्ञता व्यक्त केली.