मुंबई- मुंबईतील घाटकोपर भागात एका महिलेच्या प्रियकराने तिच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अशोक प्रेमचंद दुबे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलींची आई पाच वर्षांपासून दुबे याच्यासोबत रमाबाई कॉलनीत राहते. पतीला सोडून दिल्यानंतर तिने दुबेसोबत राहण्यास केली. ही महिला गरीब व अशिक्षीत आहे. ती एका रूग्णालयात आया म्हणून काम करते. या महिलेला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. मात्र या मुली संबंधित महिलेने आपल्या आईच्या गावी म्हणजे यूपीतील बनारस येथे ठेवल्या होत्या. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या मुलींना आईने मुंबईतल्या घरी आणले. मात्र कामानिमित्त तिला रोज बाहेर पडावे लागत असे. त्यामुळे मुली घरीच ठेवायची.
त्या काळात दुबेने या मुलींना अश्लील चित्रफीत दाखविल्या व त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणालाही सांगू नये अशी धमकी दिली. मात्र त्याचा रोजच्या त्रासाला वैतागून मुली शेजारी राहत असलेल्या महिलेकडे रोज जावू लागल्या. त्यामुळे त्या महिलेला संशय आला. शेजारील महिलेने मुलींना विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा खरा प्रकार उजेडात आला. त्यानंतर अशोकला शेजा-यांनी चांगलाच चोप दिला तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पोलिसांनी अशोकला तुरूगांत टाकले आहे.