मुंबई - गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्या एका ट्रकला अचानक आग लागून ट्रकमधील सुमारे शंभर ते १२५ सिलिंडरचा बॉम्बप्रमाणे स्फोट झाला. ही भीषण घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील मुरबाडजवळील बाटलीवाडी येथे घडली.
कर्जत- म्हसा महामार्गावरून सोमवारी रात्री जाणार्या ट्रकमधील एका गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर ट्रकमधील जवळपास शंभर ते सव्वाशे सिलिंडर फटाक्यांच्या माळेप्रमाणे एकामागे एक फुटले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले हाेते. हा संपूर्ण परिसर आदिवासी पाडा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी तुरळक वस्ती असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांचे रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. तहसीलदारांच्या आदेशावरून गावकर्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.