आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MAARD Doctor's Not Taking Strike Back After Talks Also

बहुसंख्य मागण्या मान्य, तरीही ‘मार्ड’चे डाॅक्टर संपावर ठाम; 'मेस्मा'ची तयारी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेच्या बहुसंख्य मागण्या मान्य केल्याचे सरकार सांगत अाहे, तर दुसरीकडे सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी अाश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेने कायम ठेवली अाहे. ‘मार्ड’च्या मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मक विचार करीत असून त्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. संप मागे न घेतल्यास डाॅक्टरांवर ‘एस्मा’नुसार कारवाईचा इशाराही सरकारने दिला अाहे.

वैद्यकीय विद्यार्थ्यांना पाच हजारांची सरसकट पगारवाढ देणे, डाॅक्टरांची सुरक्षा वाढवणे आणि रुग्णालयात सीसीटीव्ही बसवणे या उपाययोजना करण्याचे सरकारने मान्य केले आहे. डाॅक्टरांना सरसकट पगारवाढ दिल्याने सरकारच्या तिजोरीवर १३ कोटी ७० लाखांचा बोजा पडेल, असे तावडे यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाची अर्थसंकल्पीय तरतूद ३४२ कोटी असून त्यापैकी १३६ कोटी विद्यावेतनावरच खर्च होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना सेवाकाळात वरिष्ठ डॉक्टरांना सहायक म्हणून देण्याबाबतचा निर्णय मुख्य सचिव पी. एस. मीणा यांनी गुरुवारी घेतला हाेता.

‘मार्डच्या ९९ टक्के मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत बुधवारी मुख्य सचिव पी. एस. मीणा यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मार्डच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चिल्या गेलेल्या व त्यांनी सहमती दर्शवलेल्या मीटिंग मिनिट्सवर सही करून ते पदाधिकाऱ्यांकडे सोपवणार अाहोत,’ असे तावडे यांनी सांगितले.

राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि ४ महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर्स संपावर आहेत. त्यापैकी अकोला, धुळे, कोल्हापूर येथील डॉक्टर संपावर गेले नसून पुणे येथील ५० टक्केच डॉक्टर संपावर आहेत. या काळात रुग्णालयातील अपघात विभाग २४ तास कार्यरत राहील यासाठी डॉक्टरांची ड्यूटी लावण्यात यावी. जे शासकीय डॉक्टर्स सुटीवर आहेत त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सर्व रूग्णालयांना अतिदक्षतेचे अादेश
या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीणा यांनी गुरुवारी मंत्रालयात बैठक घेऊन संपकाळात रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही याबाबत दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.