आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशवसुतांच्या 'तुतारी’ कवितेच्या प्रेरणेतून शिल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - “एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकिन जी मी स्वप्राणाने’ ही कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांची तुतारी ही क्रांतदर्शी कविता. तुतारी कविता समाविष्ट असलेला “केशवसुत यांची कविता’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्याच्या घटनेला  १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रख्यात शिल्पकार विठोबा पांचाळ यांनी ग्राफिक शैलीतील स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले तुतारीवादकाचे अनोखे प्रतीकात्मक शिल्प साकारले आहे.  

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या कवी केशवसुत यांच्या जन्मगावी असलेल्या स्मारक परिसरात या शिल्पाचे अनावरण २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत “एक तुतारी’ या भव्य साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचदरम्यान या शिल्पाचे अनावरण होणार आहे.     
 
शिल्पकार विठोबा पांचाळ म्हणाले, सामान्य माणसाच्या मनातील भावनाच तुतारी कवितेत आली आहे. ही क्रांतीची भाषा प्रतिबिंबित होईल, असेच प्रतीकात्मक शिल्प मला साकारायचे होते. ब्राँझपेक्षा स्टेलनेस स्टीलचे शिल्प साकारणे तुलनेने अधिक कठीण असते. मालगुंड येथील केशवसुत स्मारकात उभारण्यात येणाऱ्या स्टेनलेस स्टील शिल्पातील तुतारीवादकाची उंची आहे साडेसहा फूट. त्याने हाती धरलेल्या तुतारीची उंची लक्षात घेतली तर या शिल्पाची पॅडेस्टलसह एकूण उंची साडेदहा फूट भरते. केशवसुत स्मारकातील कविराजांच्या घराजवळच हे शिल्प उभारण्यात येणार  असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिव्य मराठीशी बोलताना दिली.
 
‘तुतारी’ कवितेला १०० वर्षे पूर्ण   
कवी केशवसुत यांचा जन्म १८६६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला. पण त्यांच्या जन्मदिनांकाबद्दल निश्चित माहिती नाही. १५ मार्च किंवा ७ ऑक्टोबर अशा दोन्ही तारखा सांगितल्या  जातात. केशवसुतांच्या कवितांमध्ये समाजातील विषमता, अंधश्रद्धा, माणुसकी, स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक बंडखोरी, निसर्ग असे अनेक विषय दिसतात.
 
हुबळी येथे कवी केशवसुत यांचे ७ नोव्हेंबर १९०५ रोजी निधन झाले. केशवसुतांनी ‘तुतारी’ ही कविता २८ मार्च १८९३ रोजी मुंबईत लिहिली होती. मासिक मनोरंजनच्या जानेवारी १९०१ मधील अंकात तुतारी कविता प्रसिद्ध झाली. केशवसुतांच्या निधनानंतर  हस्तलिखितांवरून त्यांच्या कवितांची जुळवाजुळव करून शंकर काशीनाथ गर्गे यांनी “केशवसुत यांची कविता’ हा ग्रंथ प्रकाशित केला.  
बातम्या आणखी आहेत...