आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhukar Pichad News In Marathi, Tribal Development Minister, Divya Marathi

मधुकर पिचड यांनी जात चोरली, आदिम सम‍ितीने केली सीबीआय चौकशीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अादिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आपली मूळ जात लपवून जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी नागपूर येथील आदिम संविधान संरक्षण समितीने केली आहे. समितीच्या नंदा पराते यांनी दिव्य मराठीला माहिती देऊन सांगितले की, याविरोधात आम्ही लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.

पराते म्हणाल्या, पिचड हे आदिवासी विकासमंत्री आहेत. परंतु त्यांनी आदिवासींचा विकास करण्याऐवजी स्वत:चाच विकास केला आहे. त्यांनी हलवा, धनगर, गोवारी या आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे. आपल्या उच्च पदाचा फायदा उचलत त्यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला.

पिचड यांचे वडील देशमुख आडनाव लावत असत आणि त्यांच्या जातीच्या दाखल्यावर कोळी जात नमूद करण्यात आली आहे. असे असताना पिचड यांनी हिंदू महादेव कोळी अशी जातीची नोंद करत जात प्रमाणपत्र घेतले आहे. घटनेनुसार ज्या जातींना आरक्षण दिलेले आहे त्यामध्ये या दोन्ही जातींचा समावेश नाही. घटनेनुसार अनुक्रमांक 29 वर कोळी महादेव जातीचा समावेश असतानाही जात प्रमाणपत्र देणा-या समितीने वेगळी बाब म्हणून हिंदू महादेव कोळी असे जात प्रमाणपत्र देत असल्याचे नमूद करीत जात प्रमाणपत्र दिल्याचेही उघडकीस आले आहे. मधुकर पिचड यांनी शाळा सोडल्याचा दाखला यासाठी दिला. मात्र, त्या दाखल्यावरही हिंदू महादेव कोळी असा उल्लेख आहे.जात वैधता तपासताना मधुकर पिचड यांच्या 1950 पूर्वीच्या कोळी जातीच्या सबळ पुराव्याकडे जात तपासणी समितीने दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे. दिव्य मराठीला पराते यांनी ही कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत.

मुख्यमंत्र्यांना माहिती दिलीय : नंदा पराते
पराते यांनी समितीच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोन दिवसांपूर्वी एक पत्र पुराव्यांसह पाठवले असून मधुकर पिचड यांचे मंत्रिपद रद्द करावे व त्यांच्या जातीची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय न घेतल्यास न्यायालयात याबाबत याचिका दाखल करून पिचड यांची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचेही पराते म्हणाल्या.