मुंबई- अभिनेता जॉन अब्राहमच्या 'मद्रास कॅफे' या सिनेमात तमिळ अतिरेक्याची भूमिका केलेली दक्षिण भारतीय अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर याला 10 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांनी खोटी इन्व्हेसमेंट कंपनी उघडून कोट्यावधी रूपये लुबाडल्याचे समोर आले आहे. या दोघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली असून, 4 जूनपर्यंत त्यांना पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे.
गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री लीना व तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर या दोघांनी मुंबईत एक खोटी इन्व्हेसमेंट कंपनी स्थापन केली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा पट रक्कम देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अनेकांनी कोट्यावधी रूपये गुंतवले. गुंतवणूकदारांना संशय येऊ नये म्हणून या जोडीने बँक देते त्याप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिटच्या पावतीसारख्या पावत्याही दिल्या. मात्र, मुदतीनंतर जेव्हा लोक पैसे मागायला आले तेव्हा लीना आणि शेखर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे शेखर व त्याच्या खोट्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर गोरेगाव पोलिसांनी लीना, शेखर या दोघांसह अख्तर जयपुरी, नासीर जयपुरी, सलमान रिझवी आणि आदिल जयपुरी या चौघांनाही अटक केली. या सहाही जणांना 4 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाय या जोडीकडून 137 विदेशी बनावटीची घड्याळे आणि 7 महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. लीना व शेखरचा गेल्या दीड वर्षापासून हा उद्योग मुंबईत सुरु होता. दरम्यान, चौकशीदरम्यान अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
लीनाने दक्षिण भारतातील अनेक सिनेमात काम केले आहे. 2013 साली आलेल्या जॉन अब्राहमच्या मद्रास कॅफे सिनेमात तिने तमिळ अतिरेक्याची भूमिका केली होती. लीनाचे आई-वडील दुबईत वास्तव्यास आहेत. लीना 2011 साली दुबईहून बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारतात आली. मुंबईत मॉडेलिंग करत असतानाच तिने काही तमिळ व मल्याळम चित्रपटांत काम केले आहे.
लीना आणि शेखरने याआधी तामिळनाडूमधील कॅनरा बँकेला 19 कोटीला गंडा घातला होता. या केसमध्ये त्यांना 2013 साली दिल्लीतील एका फार्महाऊसमधून अटक करण्यात आले होते. त्याच वर्षी शेखरने स्वत:ला आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करुन एका उद्योगपतीकडून एका प्रोजेक्टच्या नावासाठी 76 लाख रुपये उकळले होते. यावेळी लीनाने आपण शेखरची पत्नी असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा ख-याखु-या बंटी और बबलीला पोलिसांनी गजाआड केले आहे.
पुढे आणखी वाचा, बॉलिवूडमधील ख-याखु-या बबलीविषयी...