आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्ट्राचा: विलासरावांसाठी हळहळला महाराष्ट्र, मुंबई हिंसाचाराचे कवित्व सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचा तुल्यबळ नेता गेला- केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री मराठवाड्याचे सुपूत्र विलासराव देशमुख यांचे १४ ऑगस्टला अकाली निधन झाले. महाराष्ट्राची बाजू केंद्रात लावून धरणारा नेता. राजकारणाबरोबरच साहित्य, कला, सामाजिक उपक्रमात सहभागी होणारे दिलखुलास नेतृत्व अचानक सोडून गेल्याने महाराष्ट्राला धक्का बसला. विलासरावांच्या जाण्याने काँग्रेसचे न भरून निघणारे नूकासन झाले आहे. त्यांच्यावर स्वातंत्र्यदिनी त्यांच्या मुळगावी बाभळगाव येथे पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केंद्रातील अनेक मंत्री राज्याचे पूर्ण मंत्रिमंडळ, बॉलिवूडमधील कलाकार आणि राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या लोखो जनसमुदायाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकीकडे त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना दुसरीकडे त्यांची जागा कोण घेणार, असा प्रश्नही चर्चिला जात आहे. त्यावर उत्तर नकारार्थी आहे. काँग्रेसमध्ये विलासरावांसारखा तुल्यबळ नेता नाही.
हिंसाचाराचे कवित्व, राष्ट्रवादीही गृहमंत्र्यावर नाराज - गेल्या आठवड्यामध्ये आझाद मैदानात झालेल्या हिंसक घटनेसाठी रझा अकादमी व इतर आयोजकांना जबाबदार मानून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 'मुस्लिम इन सॉलिडेरिटी फॉर जस्टिस' या संघटनेने केली. सुधारणावादी नेते असगर अली इंजिनिअर, वरिष्ठ पत्रकार जावेद आनंद, सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद आणि आवाझ-ए-निस्वाच्या सदस्या हसीना खान यांनी ही मागणी केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आझाद मैदानाच्या घटनेनंतर केलेल्या वक्तव्यावरही असगर अली इंजिनिअर यांनी टीका केली.
मुंबईतील हिंसाचारप्रकरणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्‍यावर तोफ डागली असून त्‍यांनी तात्‍काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राज यांनी केली आहे. या मागणीसाठी ते मंगळवारी मुंबईत मोर्चा काढणार आहेत.
दंगलीसाठी गृहमंत्री आणि त्यांच्या पोलिस खात्याला केवळ विरोधकच लक्ष्य करत नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर नाराज झाले आहेत.कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहखाते अपयशी ठरल्याने ते आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे, यामुळे राष्ट्रवादीमधून संताप व्यक्त होत आहे. शरद पवारांनी पुणे स्फोटानंतर अप्रत्यक्षरीत्या आर. आर. पाटील यांच्यावर टीका केल्याने त्यांच्याकडून गृहमंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याचे बोलले गेले. त्यानंतर मुंबईत हिंसाचाराची घटना घडल्याने पाटील यांनी पक्षाची आणखी नाराजी ओढवून घेतली आहे.
पूर्वांचलचे नागरिक परतीच्या वाटेवर-
आसाममधील असंतोषाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. असुरक्षिततेची भावना निर्माण झालेले पुणे-मुंबईतील सुमारे चार हजारांपेक्षा अधिक पूर्वांचल नागरिकांनी ईशान्य भारताकडे स्थलांतर केले आहे. रोजगार व शिक्षणकरिता शहरात आलेले हे नागरिक आपल्या कुटुंबीयांच्या आग्रहास्तव परतत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुण्यात आतापर्यंत ईशान्य भारतातील मुलांवर हल्ल्याचे पाच प्रकार घडले असून, त्यात 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथील विद्यार्थ्यांत भीती निर्माण झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाब पोळ म्हणाले, जर कोणाला स्वत:हून आपल्या राज्यात परत जायचे असेल तर त्यांना आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. सदर विद्यार्थ्यांना त्यांचे कुटुंबीय बोलवत असल्याने ते स्थलांतर करत आहेत. औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथूनही शिक्षण आणि रोजगारासाठी आलेले ईशान्य प्रांतातील विद्यार्थी आणि कामगार आपापल्या राज्यात परत जात आहेत.
मुंबईत सिलर किलिंग ?
मुंबईच्या विविध भागात गळा चिरुन तरुणींची हत्या केल्याची चार प्रकरणे समोर आली आहेत. यात अद्याप एकालाही अटक झालेली नाही. मृत महिलांची ओळखही पटलेली नाही. त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातवरण आहे. शनिवारी सांताक्रूझ येथील रहेजा महाविद्यालयाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये अशाप्रकारे महिलेचा मृतदेह सापडण्याची ही चौथी घटना आहे.
शुक्रवारी मलाड मालवणी येथील कारगिलनगरजवळच्या झुडपात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या तरुणीच्या गळ्यावरही धारदार शस्त्राचे वार होते. मलाडमधीलच कुरार परिसरातील एका पडिक इमारतीत ९ ऑगस्टरोजी एका महिलेचे प्रेत गोणीत बांधून ठेवलेले आढळले होते. त्याआधी ३ ऑगस्टला मीरा रोड स्टेशनजवळील खाडीत एका महिलेचे प्रेत सापडले होते. या सर्व महिलांची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या गुन्हात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मृतांचीही ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
महावितरणने दिला दरवाढीचा 'शॉक'
महागाईमुळे बेजार झालेल्या नागरिकांना आता महावितरणनेही दरवाढीचा शॉक दिला आहे. वीज नियामक आयोगाने 1 ऑगस्टपासून वीजदरांत 16.48 टक्के वाढ करण्याच्या कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
वीज खरेदीवर वाढत चाललेला खर्च तसेच इंधन दरवाढीचे कारण पुढे करून महावितरणने 17.68 टक्के दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दिला होता. आयोगाने 16.48 टक्के वाढीस मुंजरी दिली. वाढता उत्पादन खर्च आणि तूट पाहता दरवाढ अपरिहार्य असल्याचे कंपनीने प्रस्तावात म्हटले होते. सिंगल फेज निवासी ग्राहकांसाठी स्थिर आकार 30 ऐवजी 40 रुपये, तर थ्री फेजसाठी 100 रुपयांऐवजी आता 130 रुपये द्यावे लागणार आहे.