आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha Assembly Monsoon Session Demanding 14 Thousand Rupees Cr.

विधानसभेत १४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या, डॉ. आंबेडकरांच्या घरासाठी ४० कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सरकारने तब्बल १४ हजार ७९३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेच्या पटलावर मांडल्या. या मागण्यांपैकी सर्वाधिक मागण्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील नगरविकास विभागाच्या असून त्यात २ हजार ४४१ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत टोलमुक्तीसाठी ७९९ कोटींचा निधी प्रस्तावित आहे.

२० आणि २१ जुलै रोजी या मागण्यांवर चर्चा व मतदान होणार आहे. जलसंपदा विभाग १५८६ कोटी, कृषी विभाग १४०६ कोटी, विविध पुलांच्या बांधकामासाठी १०२२ कोटी रुपयांच्या मागण्यांचा समावेश आहे, ग्रामविकास विभागासाठी ९३५ कोटींच्या मागण्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. याशिवाय पीक विमा योजनेसाठी ६३० कोटी रु., प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ५५० कोटी रु., नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी ४८१ कोटी रु. आणि राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी ४७४ कोटी अशा मागण्या आहेत.

डॉ. आंबेडकरांच्या घरासाठी ४० कोटी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराच्या खरेदीचा निर्णय सरकारने घेतला आहे. या खरेदीसाठी सुमारे ४० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे करण्यात आली आहे. तसेच डॉ. आंबेडकरांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या आयोजनासाठी १२५ कोटी रु.च्या पुरवणी मागण्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.