आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिमबहुल भागातील मराठी शाळांत उर्दू शिकवणार : तावडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अल्पसंख्याक विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, यंदापासून ही योजना सर्व शाळांमध्ये लागू करणे शक्य नसल्याने फक्त मुस्लिमबहुल विभागांमधील मराठी शाळांमध्येच उर्दू शिकवण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी मंत्रालयात बोलताना स्पष्ट केले.

गेल्या वर्षी अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी मुस्लिम समाजातील मुलांसाठी मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्या वेळी सत्तेत सोबत नसलेल्या शिवसेनेने या घोषणेला विरोध करत दिवाकर रावते यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी अधिवेशनादरम्यान हिरवी टोपी आणली होती. खडसे यांच्या घोषणेनुसार जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात उर्दू शिकवण्यास सुरुवात होईल, असे म्हटले जात होते. मात्र, तावडे यांनी सर्व शाळांमध्ये सध्या तरी उर्दू शिकवता येणे शक्य नसल्याचे सांगितले.

तावडे म्हणाले, अल्पसंख्याक विभागाकडून प्रस्ताव आला आहे. आम्ही त्यावर गंभीरतेने विचारही करत आहोत. परंतु उर्दू शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याने सर्व शाळांमध्ये ही योजना राबवणे कठीण आहे. उर्दू शिक्षक तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याने सध्या फक्त मुस्लिमबहुल विभागातील मराठी शाळांमध्येच उर्दू शिकवण्यात येईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून जास्त उर्दू शिक्षक उपलब्ध होतील आणि त्यानंतरच सर्व मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...