आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा दोषी आढळल्या तर हिमालयात जाईन, जानकरांकडून पाठराखण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुरातही पंकजा यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. - Divya Marathi
नागपुरातही पंकजा यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.
मुंबई - चिक्की कंत्राटप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची पाठराखण करण्यात भाजपचेच नेते हात अाखडता घेत असले तरी महायुतीतल मित्रपक्ष राष्ट्रीय समाजवादी पक्ष मात्र त्यांच्या समर्थनार्थ सोमवारी राज्यभर रस्त्यावर उतरला होता. मुंबईत चेंबूर येथे आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत मुंडे यांना पाठबळ दिले. या अाराेपांमागे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व धनंजय मुंडे असल्याचा अाराेपही त्यांनी केला.

मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यात २०६ काेटींचा भ्रष्टाचार झाला अाहे, असा अाराेप काँग्रेस व राष्ट्रवादीने केला अाहे. मात्र, ‘पंकजा भ्रष्टाचार करणे शक्य नाही. चिक्की कंत्राट प्रकरणात त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे’, असा दावा करत ‘पंकजा दोषी आढळल्यास मी राजकीय संन्यास घेऊन हिमालयात जाईन’, अशी ग्वाही आमदार जानकर यांनी दिली.

चेंबूरमधील पांजरापोळ चौकात स्वत: जानकर यांनी रास्ता रोकोचे नेतृत्व केले. या वेळी हजारो कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्या समर्थनार्थ घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहीर निषेध केला. रासपचा हा रास्ता रोको शांततेच्या मार्गाने झाला. या आंदोलनामुळे सायन ते पनवेल या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.
‘पंकजाताई के सम्मान मे, रासप मैदान में’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. तसेच पूर्व मुक्त मार्गाच्या एंट्रीला जिकडेतिकडे रासपचे पिवळे झेंडे दिसत होते.

राज्यात बारामती, पुणे, सातारा, परळी, बीड, गंगाखेड, परभणी, म्हसवड, दहीवडी, बोरिवली, सांगली, माढा, टेंभुर्णी, बोरीली, विलेपार्ले येथेही रासप कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले होते.

पाठिंबा कशासाठी?
रासप संस्थापक महादेव जानकर सध्या विधान परिषेदवर आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपला साथ दिल्यामुळे त्यांना परिषदेचे बक्षीस मिळाले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या ‘माधव’ आघाडीतील जानकर बिनीचे नेते होते. त्याचे पांग फेडण्यासाठी जानकर यांनी पंकजा कोंडीत सापडल्या असताना आपल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणले.

काँग्रेस अाज पुरावे देणार
पंकजा मुंडे यांच्या खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे साेपवण्यात येतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. सावंत यांनी याबाबतची तक्रार ‘एसीबी’कडे दाखल करून हे प्रकरण बाहेर काढले हाेते. इतर अनेक प्रकरणांप्रमाणेच या गैरव्यवहाराचीदेखील खुली चौकशी करण्याची मागणी ‘एसीबी’चे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, दीक्षित यांची भेट घेतल्यानंतर हे पुरावे सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले अाहे.
पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाले जानकर...
बातम्या आणखी आहेत...