आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahajenco Spend 9 Thousand On Corrupted Officers Madhav Bhandari

‘महाजनको’चा भ्रष्ट, अकार्यक्षम अधिका-यांवर नऊ हजार कोटींचा व्यर्थ खर्च - माधव भंडारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भ्रष्ट व अकार्यक्षम अधिका-यांना सांभाळण्यासाठी महाजेनको वीज कंपनी 9 हजार कोटींचा वाढीव खर्च करत आहे. वीज दरवाढीच्या रूपाने त्याचा भार ग्राहकांच्या डोक्यावर टाकला जात असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी केला.


सन 2009 पासून महाजनकोमध्ये ‘निर्देशक प्रकल्प’ या पदावर कार्यरत असलेले सी. एस. थोटवे यांची नेमणूक वादग्रस्त आहे. थोटवे यांना प्रकल्प उभारणीच्या कामांचा अनुभव कधीही नव्हता. आपल्या सेवेतील 1989 ते 2006 या काळात त्यांनी भांडार अधिकारी म्हणून काम पाहिले. गेल्या चार वर्षांत थोटवे यांच्या अनुभवहीन नेतृत्वामुळे नव्या प्रकल्प उभारणीचे काम रेंगाळत आहे. एकूण 23,120 कोटी किमतीचे 4570 मेगावॅट क्षमतेचे 10 प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांची किंमत आता 8616 कोटींनी वाढली आहे. शिवाय वीज निर्मितीत वाढ होत नसल्यामुळे खासगी कंपन्यांकडून व अन्य राज्यांकडून चढ्या दराने वीज खरेदी करावी लागत आहे. याच काळात पारस, भुसावळ आणि कोराडी या प्रकल्पांत मोठे अपघात झाले. ऑगस्ट 2008 मध्ये पारस येथे कोळसा हाताळणी केंद्र कोसळले. तर कोराडी येथे शीतकरण केंद्र कोसळले. भुसावळ येथे संपूर्ण चिमणी कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पारस येथे दोन महिन्यांत दोन अपघात झाले व वीज निर्मिती काही महिने बंद पडली होती, परंतु तिन्ही अपघातांची चौकशी झाली नाही. या अपघातांमुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण प्रकल्पाचा खर्च वाढला, असाही आरोप भंडारी यांनी केला आहे.


आरोप चुकीचे : महाजनको
महाजेनकोने आरोपांचे खंडन केले असून भाजपने वस्तुस्थितीची पूर्ण माहिती व खातरजमा न करता चुकीचे आरोप केल्याचा खुलासा केला आहे. महानिर्मितीचे औष्णिक प्रकल्प उभारणीचे काम जाणीवपूर्वक रखडवले जाते हा आरोप चुकीचा असून महानिर्मितीने त्याबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी सर्वांसमोर ठेवली आहे, असे त्यांनी खुलाशामध्ये म्हटले आहे.