मुंबई- डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. विकास महात्मे आणि आता छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर खासदारकी देत भाजपने महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सुरू केला आहे. हा प्रयोग म्हणजे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी धोक्याची घंटा असल्याचे समजले जात आहे.
2017 मध्ये राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपने टाकलेले हे पाऊल आहे. हा प्रयोग म्हणजे मित्रपक्ष भविष्यात डोईजड होऊ नये, हेच यामागचे खरे राजकारण असल्याचे सांगितले जाते.
नागपूरमधून नितीन गडकरी यांचे निकटवर्ती असलेल्या डॉ. विकास महात्मे यांना दिलेल्या खासदारकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेली काही वर्षे धनगर समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने उभी करणाऱ्या महादेव जानकर यांनी राज्यात स्वत:चा असा मतदार वर्ग तयार केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिंब्याचा जानकर यांना मोठा फायदा झाला; पण मुंडे यांच्या अकाली निधनाचा जानकरांना फटकाही बसला असून फडणवीस सरकारकडून अजूनही म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही. त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली गेली असली तरी त्यांचे लक्ष आहे ते कॅबिनेट मंत्रिपदावर. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कदाचित त्यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण केली जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महादेव जानकर निराश असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते भाजपसाठी धोकादायक ठरू शकतात, हे लक्षात घेऊन आतापासून महात्मेंच्या रूपाने जानकरांसमोर आव्हान उभे करण्यात आले आहे. याशिवाय राज्यमंत्री राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्याने त्यांच्या रूपातही भाजपला पक्षातच चेहरा उपलब्ध झाल्याने भाजप जानकरांची फारशी काळजी करत नसल्याचे दिसून येते.
भाजपने भीमशक्तीसाठी रामदास आठवलेंना जवळ घेतले. मात्र, खासदारकीबरोबरच मंत्रिपदही मिळेल, ही आठवलेंची इच्छा भाजप पूर्ण करण्यास तयार नाही आणि ही इच्छा पूर्ण होईलच अशी शक्यताही दिसत नाही. याउलट नियोजन आयोगाचे माजी सदस्य नरेंद्र जाधव यांना राज्यसभेसाठी तिकीट देत दलितांना भाजप न्याय देत असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील राजू शेट्टींचे महत्त्व कमी करण्यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. संभाजीराजे यांना पुढे आणण्यामागे मराठा आरक्षणावरून सुरू असलेले राजकारणही कारणीभूत असल्याचे बोलले जाते. विनायक मेटेंनाही हा इशारा असल्याचे बोलले जात आहे.
पुढे वाचा, काय आहेत याचे राजकीय आणि सामाजिक संदर्भ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)