आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिनाची जय्यत तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंदू मिलची जागा राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा झालेला निर्णय, निवडणुकाच्या तोंडावर राजकीय लाभासाठी सरसावलेले विविध रिपब्लिकन गट आणि स्मारकाच्या भूमिपूजनाचे विविध संघटनांनी दिलेले इशारे लक्षात घेता शुक्रवारचा महापरिनिर्वाण दिन आगळावेगळा होण्याची शक्यता आहे.
महापरिनिर्वाण दिनाला 10 लाखांच्या आसपास भीम अनुयायी चैत्यभूमीला भेट देतात. त्यासाठी बृहन्मुंबई पालिका अर्थसंकल्पात 1 कोटीची तरतूद करत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने चैत्यभूमीवर चोख व्यवस्था ठेवली आहे. निवार्‍यासाठी 1 लाख चौरस फुटाचे दोन मंडप शिवाजी पार्कवर उभारण्यात आले आहेत. 10 शौचकूप असणारी 12 फिरती शौचालये, पाण्याचे 15 टँकर्स आणि पाण्याचे 270 नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. बेस्ट बसच्या फेर्‍या रात्रभर सुरू राहणार आहेत. इंदू मिलच्या मागे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र अशी 250 स्नानगृहे उभारण्यात आली असून 150 बंदिस्त शौचालये बांधण्यात आली आहेत. शिवाजी पार्कवर 500 स्टॉल्सचे वाटप करण्यात आले असून 40 डॉक्टरांची तीन पथके 24 तास तत्पर ठेवण्यात आली आहेत.
यंदाचा महापरिनिर्वाण दिन गर्दीचे विक्रम मोडेल, अशी शक्यता महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कसबे यांनी वर्तवली. गुरुवारी बृहन्मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे व भालचंद्र मुणगेकर यांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. त्यामुळे रिपाइं नेत्यात त्यांच्या उपस्थितीची चर्चा होती. शुक्रवारी शिवाजी पार्कवर रिपब्लिकन गटांच्या वेगवेगळ्या सहा सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
आंदोलनाचे सावट
महापरिनिर्वाण दिनादिवशी इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा इशारा ‘रिपाइं’ने दिला आहे. इतर गटांची छोटी-मोठी आंदोलने चैत्यभूमीवर होणार आहेत. ऐन महापरिनिर्वाण दिनाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इंदू मिलबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.