आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीची ‘गँग’च चालवतेय ‘आप’; महाराष्ट्रातील नेत्यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘सध्या आम आदमी पक्षाची सगळी सूत्रे दिल्लीतील ‘गँग’कडून चालवली जात आहेत. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. या घडीला पक्षात सुरू असलेल्या कारभाराचे वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,’ अशा प्रतिक्रिया आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून व्यक्त होत आहेत.

गेल्या महिन्यात आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फेरबदलाच्या नावाखाली महाराष्ट्राची सर्व कार्यकारिणीच बरखास्त केली होती. त्याचा राग म्हणून पक्षाचे महाराष्ट्रातील नेते मयंक गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. ‘अरविंद केजरीवाल यांच्याकडून पक्षात गचाळ राजकारण खेळले जात आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली होती. या घडामोडींनतर राज्यातील बहूतांश नेते व कार्यकर्त्यांमध्ये ‘आप’च्या दिल्लीस्थित नेत्यांविरोधात असंतोषाचे वातावरण आहे.

राज्यातीलच पक्षाचे वरिष्ठ नेते रवी श्रीवास्तव यांच्या मते, ‘मयंक गांधींसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा जर पक्षातील रस कमी होत असेल तर तर ‘आप’ ने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दिल्लीतील पक्षाचे काही आमदार महाराष्ट्रातील पक्षाचे सूत्रे हाती घेऊ इच्छित आहेत, मात्र त्यांना येथील स्थानिक विषयांबाबत कोणतेही ज्ञान नाही.’

मुंबई दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढविलेले सुंदर बालकृष्णन म्हणाले, ‘मयंक गांधी व प्रदेशाध्यक्ष सुभाष वारे यांनी महाराष्ट्रात पक्षाचे चांगले संघटन केले होते. विस्तार, बुनियाद यासारखे पक्षाचे कार्यक्रमही या दोघांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात राबवण्यात आले. शेतकरी यात्रा, भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईन ही कामेही वाखाणण्याजोगी होती. मात्र दुर्दैवाने पक्षाच्या नेतृत्वाने या दोघांवरही राजीनामे देण्याची वेळ आणली. इतर पक्षांप्रमाणेच ‘आप’ची कृती राहिल्यास भविष्यात या पक्षाला फारसे भवितव्य राहणार नाही,’ अशी भीतीही बालकृष्ण यांनी बोलून दाखवली.