आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi, Congress NCP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभेची रणधुमाळी: आघाडीत कुरबुर पण युती टिकल्याने तडजोड शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीचे घोडे गंगेत न्हाण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच काँग्रेस आघाडीही आता तडजोडीच्या दिशेने वाटचाल करू लागली असली तरीही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची वाटणी आणि १४४ जागांची आग्रही मागणी राष्ट्रवादीने केल्याने आघाडीत नवाच पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आघाडी तुटली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीची बुधवारी सकाळी बैठक आहे.

महायुती होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसलेल्या आघाडीने आता महायुती होणार हे लक्षात येताच आघाडीतही आपली एकी टिकविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. काँग्रेसमध्ये एक मोठा गट राष्ट्रवादीशी युती करू नये, या मताचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दबावाला भीक घालायची नाही, अशी रणनीती काँग्रेसने अवलंबली आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या स्वरूपसिंह नाईक यांचा पराभव करून शरद गावित निवडून आले होते. आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी मागणार आहे. दोन्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाडून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदारांनी आपापली राजकीय सोय पाहत काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागांवरील दावेदारी सोडताना चांगलीच घासाघीसी केली जाईल, अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादीची पडती बाजू.. १३० जागांवर तडजोड शक्य
महायुती झाली नसती तर राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार होती. मात्र १४४ जागांसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीचे नेतेही खासगीमध्ये ही मागणी मंजूर होणार नाही, हे कबूल करतात. त्यामुळे १३० जागांवर तडजोड करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, कारण आता आमची बाजू पडती आहे, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

राणेंच्या गौप्यस्फोट, मुख्यमंत्र्यांची पंचाईत
राष्ट्रवादीने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अपक्ष आमदारांच्या जागांसह १४४ जागा मागितल्या आहेत,’असे नारायण राणे यांनी सांगितले. चर्चेतील हे गुपित राणेंनी फोडल्याने पंचाईत झालेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दल काहीही बोलणे टाळले.

काँग्रेसची भीती
जागा वाटपानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी २००९ वा २००४ प्रमाणेच पाडापाडीचे राजकारण करेल आणि पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. आजच्या बैठकीत हीच भीती काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे उत्तर
काँग्रेसच्या आरोपामुळे खवळलेल्या अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिल्यावर मात्र काँग्रेसची बोलतीच बंद झाली. ‘तुम्हाला असे वाटत असेल तर मग एक करू या, मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षासाठी वाटून घेऊ या,’ असा प्रस्ताव पवारांनी ठेवताच काँग्रेस निरूत्तर झाली.

..आणि पुन्हा स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याने आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा सुरू झाली असतानाच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची राष्ट्रवादीने मागणी केली नसून तो केवळ काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रकार होता, असे राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.