मुंबई - महायुती आणि आघाडीमधील जागावाटपाचा घोळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तोडग्याची वाट न पाहता ११८ उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने आघाडी घेतली. काँग्रेसच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील २० मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील उमेदवाराचा या यादीत समावेश नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांचा समावेश आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीबद्दल रहस्य कायम असताना दोन्ही पक्षांनी बुधवारी परस्परांशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे आघाडीच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त केली जात असतानाच रात्री काँग्रेसने ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेले बहुतांश मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचे असले तरीही उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आणण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. महायुतीचे काय होते हे बघूनच
आपण आघाडीबाबत निर्णय घ्यायचा या रणनीतीनुसार दोन्ही काँग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्याऐवजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बुधवारी आपल्या मतदारसंघात निघून गेल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांत नाराजी व्यक्त केली जात होती.तिकडे महायुतीच्या गोटात बुधवारीही जागावाटपाचे घोंगडे भिजतच राहीले. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली.
* देहाडे, दर्डा, परदेशींना उमेदवारी
औरंगाबाद प. : जितेंद्र देहाडे
औरंगाबाद पूर्व : राजेंद्र दर्डा
फुलंब्री : कल्याण काळे
वैजापूर : दिनेश परदेशी
सिल्लोड : अब्दुल सत्तार
नांदेड उत्तर : डी.पी. सावंत
नांदेड द.: ओमप्रकाश पोकर्णा
देगलूर : रावसाहेब अंतापूरकर
मुखेड : हनुमंत बेटमोगरेकर
हदगाव : माधव जवळगावकर
हिंगोली : भाऊ पाटील
जिंतूर : रामप्रसाद बोर्डीकर
जालना : कैलास गोरंट्याल
लातूर ग्रामीण : त्र्यंबक भिसे
लातूर शहर : अमित देशमुख
औसा : बसवराज पाटील
उमरगा : किसन कांबळे
तुळजापूर : मधुकर चव्हाण
कळमनुरी : संतोष तरपे
निलंगा : अशोक निलंगेकर
भोकर, परळीकडे सर्वांचेच लक्ष
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मागच्या वेळी भोकर मतदारसंघातून निवडून आले होते. ते नांदेडमधून लोकसभेवर गेल्यामुळे भोकरमधून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. काँग्रेसने या यादीत येथील उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील उमेदवारही या यादीत जाहीर केला नाही. या मतदारसंघातून धनंजय मुंडेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचे असले तरीही तेथून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीचा नवा फॉर्म्युला
शिवसेना-१५१, भाजप-१२३, मित्रपक्ष- १४
शहांच्या उपस्थितीत आज तोडगा? : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा गुरुवारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमासाठी मुंबईत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महायुतीमधील जागावाटपावर तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. महायुतीत लांबलेली जागावाटपाची कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
सज्जतेच्या सूचना
जागावाटपाचा फॉर्म्युला तयार असून संभाव्य उमेदवारांना कागदपत्रे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. किचकट प्रक्रिया असल्याने चांगला सीए नेमून संपत्तीचे विवरण भरावे असे आदेश सर्वांना देण्यात आले आहेत.
उद्या यादी?
महायुतीची यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. गुरुवारी जागावाटपाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि घटक पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत घोषित केला जाणार आहे.