आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election BJP CM Candidate Devendra Phadanvis

दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र! युतीत बेकीची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरेंद्र मोदींच्या देशभरातील लाटेमुळे भाजपला अस्मान ठेंगणे झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही आता राज्यातील भाजप नेते सरसावले असून ‘दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र‘, अशा घोषणा सोशल साइट्सवरून दिल्या जात आहेत. राज्यातील प्रमुख नेते नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात महत्त्वाची खाती देऊन महाराष्ट्रासाठी तरुण चेहरा आणण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडूनही मिळत आहे.
युतीच्या विधानसभेतील जागवाटपाच्या सूत्रांनुसार शिवसेनेकडे 171 जागा असून भाजपच्या वाट्याला 117 जागा आहेत. मात्र मोदी यांच्या लाटेनंतर भाजपला हे सूत्र मान्य नाही. आम्हाला अधिक जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तसेच ठाण्यातील भाजपचे नेते संजय केळकर यांनी उघडपणे जागा वाढवून मिळायला हवेत, अशी मागणी केली आहे. ज्याच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री हे सुत्र ठरलेले असतानाही भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्यास सुरूवात झाली आहे.
राज्यात भाजपात गडकरी व मुंडे असे दोन गट असून मुंडे गटाचे शिवसेनेशी सख्य आहे. राज्याची सुत्रे मुंडेंच्या हाती दिल्यास ते शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देतील, असे भाजपला वाटते. त्यापेक्षा अभ्यासू व तरूण चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे आणल्यास शिवसेनेला रोखता येईल. मुख्य म्हणजे गडकरींचाही देवेंद्रला पूर्ण पाठिंबा असणार आहे. याशिवाय विनोद तावडे, आशिष शेलार ही भाजपमधील तरूण नेतेही देवेंद्रच्या मागे उभे राहतील, असे पक्ष नेतृत्वाला वाटते.
महाराष्ट्रातही राबवणार अमित शहा पॅटर्न !
देवेंद्र यांचे नाव पुढे करतानाच त्यांच्या मागे भाजपचे ‘चाणक्य’ व नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांची ताकद उभी करायची, असा विचार पक्षाकडून केला जात आहे. संघटन, प्रसार माध्यमांमधील प्रचार, आर्थिक ताकद, सभा, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन ताकद उभी करणे अशा सर्व गोष्टी उभ्या करून निवडणुका जिंकण्याचे तंत्र अमित शहांकडे आहे. त्यामुळेच राज्यात त्यांनाच प्रभारी म्हणून पाठवण्याची विनंती नरेंद्र मोदींना करण्यात येणार असल्याचे समजते.
वातावरण निर्मितीला प्रारंभ
आजवर राज्यात शिवसेनेच्या आधाराने भाजप वाढली. याची जाण असल्यामुळेच रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम या छोट्या पक्षांचा समावेश करून युतीची महायुती करताना गोपीनाथ मुंडेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कायम विश्वासात घेतले. मात्र मोदींची लाट आल्यापासून भाजपमधील काही अतिउत्साही नेत्यांनी जास्त जागा घेता येतील, असे गृहीत धरून वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
युतीत बेकीची चिन्हे
भाजपच्या अतिउत्साहीपणामुळे युतीत बेकी निर्माण होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांना वाटते. शिवसेना काही जागांची अदलाबदली करू शकते. मात्र संख्येबाबत ते एक पाऊल मागे घेणार नाहीत. महायुतीमुळे आता छोट्या पक्षांनाही जागा द्याव्या लागणार आहेत. शिवाय भविष्यात शेकाप आणि अन्य छोटे पक्ष महायुतीत येण्याची शक्यता असल्याने भाजपच्या पदरात आधीच जागा टाकण्यासाठी शिवसेना कदापि तयार होणार नाही, असे बोलले जाते.