औरंगाबाद - प्रत्येक निवडणुकीत अर्ज दाखल करताना किंवा प्रचाराचा नारळ फोडताना बहुतांश राजकीय नेते मुहूर्ताला फारच महत्त्व देत असतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाला, तेव्हा इच्छुकांना उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे दोनच दिवस शुभ आहेत, अशी माहिती वेदमूर्ती अक्षय गुरुजी तांदुळजे यांनी दिली. तब्बल सोळा वर्षांनंतर यंदा ऐन नवरात्रात विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया आल्याचेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी १९९८ मध्ये नवरात्रात निवडणुकांचा बिगुल वाजला होता.
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करत असले, तरी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आयोगाकडून घोषणा होताच भावी आमदारांची पावले भविष्य वर्तवून शुभ मुहूर्त सांगणार्या गुरुजींकडे वळणार यात शंका नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २० ते २७ सप्टेंबर ही मुदत असली, तरी या आठ दिवंसापैकी २४ सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास योग्य काळ नसल्याचे जाणकारांचे मत आहे. म्हणून २५ व २६ सप्टेंबर हे दोन दिवसच शुभ असल्याचे भविष्यकारांचे म्हणणे आहे. २३ सप्टेंबर रोजी अमावास्या सकाळी ९.४५ ला लागून २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४४ वाजता संपते. हे दोन्ही दिवस अमावास्या असल्याने २५ व २६ सप्टेंबर हे दोनच दिवस उमेदवारांसाठी शुभ आहेत. यात २५ तारेखस घटस्थापना होणार आहे.
२७ सप्टेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असला, तरी त्या दिवशी वैधृती आहे. या योग शास्त्रानुसार कुयोग मानला जातो. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू नये, असे जाणकारांचे मत आहे. म्हणून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता कमीच आहे.
कोणत्या आहेत शुभ घटिका..
२५ सप्टेंबर
सकाळी १०.४८ ते दुपारी १२.१८ शुभ योग
दुपारी १२.१८ ते १३.४८ लाभ योग
दुपारी १३.४८ ते १५.१८ अशुभ काळ
(अमृतयोग असला, तरी राहू काळ आल्याने ही वेळ अनिष्ट मानली गेली आहे.)
२६ सप्टेंबर
सकाळी ९.१८ ते १०.४८ अमृत काळ
सकाळी १०.४८ ते १२.१८ राहू काळ - अशुभ काळ
दुपारी १२.१८ ते १२.४८ अभिजित मुहूर्त
दुपारी १२.४८ ते १३.४८ शुभ
दुपारी ४.४८ ते सायंकाळी ०६.१८ शुभ मुहूर्त