आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Mlc Byelection, Jankar, Bhandari, Khot File Nomination Today

विधान परिषद निवडणूक: सुभाष देसाई, स्मिता वाघ, महादेव जानकर व मेटेंचा अर्ज दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपकडून स्मिता वाघ तर मित्रपक्षांतून महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना सधी देण्यात आली आहे. या नेत्यांनी विधानभवनात आज दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या चारही जागांसाठी प्रत्येकी 144 प्रथम पसंतीच्या मतांची गरज असल्यामुळे भाजप-शिवसेनेसह महायुतीकडे चारही जागा जाणार हे निश्चित झाले आहे. विजयाची खात्री नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत अर्ज दाखल करणार नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस निवडणुकीत उतरेल असे वाटत नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सत्तारूढ पक्षाला मिळणार्‍या चार जागांपैकी एक जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या जागेवर शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई हे उमेदवारी अर्ज सादर करतील. एक जागा भाजप स्वत: लढवणार आहे. त्या जागेसाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि माजी आमदार अतुल शहा यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, भाजपने महिला भाजपच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना संधी देत अनपेक्षित धक्का दिला आहे. स्मिता वाघ या जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. मे 2013 मध्ये वाघ यांची भाजप महिला प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. उर्वरित दोन जागा राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटनेला सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे देसाई, वाघ यांच्यासह रासपचे महादेव जानकर आणि मेटे यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र, आपण सत्ताधारी पक्षाची आमदारकी सोडून महायुतीला साथ दिली त्यामुळे आपली विधान परिषदेवर वर्णी लागलीच पाहिजे असे मेटे यांनी महायुतीला ठासून सांगितले. त्यामुळे ऐनवेळी खोत यांच्या नावावर फुली मारत भाजपने मेटेंना संधी देण्याचा निर्णय घेतला. खासदार रामदास आठवले यांच्या पक्षाला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या दोन नेत्यांची महामंडळावर वर्णी लागेल. तर, आठवलेंना केंद्रात राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.
भाजपने आठवलेंना राज्यात कॅबिनेटमंत्रीपद देण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी आठवले यांनी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. भाजपला आठवलेंना राज्यात आणून शायना एन सी यांना राज्यसभेवर लावायचे आहे. मात्र, आठवलेंनी नकार दिल्याने भाजपच्या प्रयत्नाला सध्यातरी खो बसला आहे. दानवे लवकरच केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्या जागी आपली वर्णी लावावी असे आठवलेंनी भाजपकडे साकडे घातले आहेत.
महायुतीतून बाहेर पडण्याचा सदाभाऊ खोत यांचा इशारा- विधान परिषदेवर शेवटपर्यंत नाव चर्चेत राहिल्यानंतर ऐनवेळी सदाभाऊ खोत यांच्याऐवजी विनायक मेटेंना संधी देण्याचे भाजपने निश्चित केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आश्वासन दिल्यानुसार आमच्या पक्षाला संधी द्यायला हवी होती. आम्ही आता महायुतीत राहायचे की नाही याचा निर्णय पुढील महिन्यात पक्षाच्या बैठकीत घेऊ असे सदाभाऊ खोत यांनी नाराजीची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांची याबाबत कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या मार्गात राजू शेट्टींनीच खोडा घातला नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे.
पुढे वाचा, महादेव जानकर, मेटे यांना का संधी दिली भाजपने...तर का नाकारले खोत यांना...