आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Monsoon Sation Starts On 13 July

आजपासून अधिवेशन: मराठीला राजभाषेचा दर्जा, कायदेशीर तरतुदीचे विधेयक मांडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी ही राज्याची राजभाषा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबतची कायदेशीर तरतूद असलेले विधेयक सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. मंत्रिपरिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिली.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अतिथी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, मराठी ही जरी राज्य कारभाराची भाषा असली तरी राज्याच्या स्थापनेपासून मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त झाला नव्हता. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत त्यावर सर्वंकष चर्चा झाली असून विधिमंडळात त्याबाबतचे विधेयक मांडण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

सेवा हमी कायदा मंजुरीसह १५ विधेयके मांडण्यात येणार
मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून साकारलेला सेवा हमी कायदा अधिवेशनात पारित करण्याचा प्रयत्न आहे.शिक्षण शुल्क नियमन कायदा, मनपा सुधारणा कायदा, सागरी मासेमारी सुधारणा विधेयक, जि.प. व पं.स. सुधारणा विधेयकासारखी १५ विधेयके अधिवेशनात मांडली जातील.

पीक कर्ज देण्यासाठी सरकार घेणार ५०० कोटींची हमी
आजारी बँकांच्या परिसरातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून सरकार ५०० कोटींची हमी घेणार आहे. ऊस उत्पादकांना हमीभावातील फरक देण्यासाठी केंद्राने कारखान्यांना दिलेल्या दोन हजार कोटींच्या कर्जाचे पहिल्या वर्षाचे व्याज केंद्र, तर उर्वरित राज्य सरकार देणार आहे.
कायद्यात तरतूद नव्हती : महाराष्ट्र राज्य १९६० साली अस्तित्वात आले. तेव्हापासून मराठी राजभाषा असल्याचा दावा केला जात होता. मात्र तशा स्वरूपाची कोणतीही स्पष्ट तरतूद कायद्यात नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही मराठीला कायदेशीररीत्या राजभाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्र्यांवरील आरोपांच्या चौकशीची सरकारची तयारी आहे. विरोधकांनी पुरावे असल्यास द्यावेत, असे खुले आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. शिवाय अमेरिका दौऱ्याच्या वेळी विमानाला झालेल्या विलंबाचीही चौकशी केंद्रीय स्तरावर सुरू आहे. राज्यानेही चौकशीचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.