आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवणी मागण्यांवर विरोधकांचा सभात्याग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारने सोमवारी मांडलेल्या पुरवणी मागण्यांवर चर्चेसाठी फक्त दीड तासाचा वेळ दिल्याने संतप्त विरोधकांनी मंगळवारी सभात्याग केला. तसेच वारंवार पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करणे, हे आर्थिक बेशिस्तीचे लक्षण असल्याची टीकाही केली.

पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेची वेळ कमी केल्याने विरोधक मंगळवारी आक्रमक झाले. एकनाथ खडसेंनीही नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. त्यानंतर खडसे म्हणाले, डिसेंबर 2013 मध्ये सरकारने 11 हजार 695 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यानंतर आता पुन्हा 1370 कोटींच्या मागण्या मांडल्या. वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार अर्थिक तरतूद करत असेल, तर ही आर्थिक बेशिस्त आहे.

शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी वीजदर कपातीच्या मुद्द्यावर सरकारच्या धोरणावर टीका केली. राज्यातल्या वीज ग्राहकांचा विचार करताना राज्य सरकारने मुंबईकरांचा विचार केला नाही. पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 650 कोटींची तरतूद राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी केली, पण एक पैसाही मुंबईकरांसाठी नाही. सरकारच्या या धोरणाला काय म्हणावे, असा सवाल देसार्इंनी केला. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी विधिमंडळाच्या आवारात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली.

मराठा आरक्षणाबाबत गंभीर : पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच शिवस्मारकाच्या कामालाही वेग दिला जाईल, असेही पवार म्हणाले.