आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला प्रत्युत्तर : शिवसेनेनेही थोपटले स्वबळासाठी दंड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेबरोबर फरपटत जाण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा इशारा देत युती तोडण्याची भाषा करणार्‍या भाजपला धडा शिकवण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. भाजपच्या भूमिकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असून त्यांनी विधानसभेच्या सर्वच 288 जागांसाठी सज्ज राहण्याचे आदेश विभागप्रमुखांना सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुरुवारी रात्री व शुक्रवारी ‘मातोश्री’वर झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत या विषयावर खलबते झाली. याविषयी काही विभागप्रमुख तसेच जिल्हाप्रमुखांकडे विचारणा केली असता त्यांनी याविषयी आधी काही बोलण्यास नकार दिला. मात्र, नंतर स्वबळावर आमचीही तयारी असल्याचे सांगितले.

मुंबईतील एका विभागप्रमुखाने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला एकट्याने तयारीला लागा, असे आदेश दोन आठवड्यांपूर्वी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातच दिले होते. त्यानुसार आम्ही तयारीही सुरू केली आहे. शिवसेनेकडे सध्या सर्वच मतदारसंघांचा अहवाल तयार आहे. जिंकण्याच्या संधी किती आहेत, प्रतिस्पध्र्याची ताकद किती, हे सारे यात आहे. भाजपच्या धमकीनंतर पुन्हा एकदा आम्हाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपने स्वबळाची भाषा केल्यास शिवसेनेच्या शिबिरांमध्ये उत्साह संचारतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जोपर्यंत माझ्याशी बोलणार नाहीत, तोपर्यंत इतर कोणाच्याही बोलण्याला मी फारशी किंमत देत नाही. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मुंडे नसल्याने उरला नाही शिवसेनेला वाली
‘युतीची महायुती करण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा होता, हे करताना त्यांनी कायम उद्धव यांना विश्वासात घेतले, त्यांचा मान राखला. आज मुंडे हयात असते तर युती तोडण्याबाबत बोलण्याची कोणाची हिंमत झाली नसती. मात्र, गडकरी, फडणवीस, तावडे हे कधीच शिवसेनेचे जिवलग मित्र नव्हते. उलट गडकरींची पसंती राज ठाकरे राहिली आहे’, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.

बाळासाहेब असते तर धडाच शिकवला असता!
‘शिवसेनेचा हात धरून राज्यात फोफावलेल्या भाजपला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. जास्त जागांची मागणीही याच अपेक्षेतून होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर युती तोडण्याची भाषा करणार्‍या ‘कमळाबाई’ला त्यांनी चांगलाच धडा शिकवला असता’, अशा शब्दांत शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

का वाढले ‘धाकट्या भावा’चे धाडस?
2004 विधानसभेत शिवसेना 171 व धाकट्या भावाच्या भूमिकेत असलेली भाजप 117 जागा लढली. मात्र, 2009 च्या निवडणुकीत 169 जागा लढवूनही शिवसेनेला फक्त 46, तर 119 जागा लढवणार्‍या भाजपला 47 जागा मिळाल्या. कमी जागा लढवूनही एक जागा जास्तच मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. त्यामुळे भाजपला ‘मोठय़ा भावा’ची जागा हवीय.

‘नरेंद्र मोदी लाटेमुळे राज्यात लोकसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला. याच्या जोरावर भाजप निम्म्या जागा मागत आहे. शिवसेना त्याला तयार होणार नाही, हे लक्षात आल्याने गडकरी, फडणवीस, तावडे यांनी स्वबळाची मागणी कार्यकर्त्यांच्या तोंडून वदवून घेतली’, असे शिवसेनेच्या एका जबाबदार नेत्याकडून सांगण्यात आले.

(फोटो - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे)