आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अरुणाचल प्रदेश गायब करणार्‍यांविरोधात एफआयआर नोंदवणार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दहावी भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात भारताच्या नकाशातून अरुणाचल प्रदेश गायब करणार्‍या अभ्यास मंडळाच्या सदस्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

दोन महिन्यांपूर्वी भूगोलाच्या पुस्तकातून अरुणाचल प्रदेश गायब असल्याची बाब उघड झाल्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. यासंदर्भात अमीन पटेल, प्रशांत ठाकूर, अशोक जाधव, जगन्नाथ शेट्टी आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर या प्रकाराला जबाबदार असलेल्या भूगोल अभ्यास मंडळ व नकाशाकारांना बरखास्त करण्याची कारवाई केल्याची माहिती दर्डा यांनी सभागृहाला दिली, परंतु त्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. हा प्रश्न देशाच्या अस्मितेशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. त्यावर दर्डा यांनी ही चूक अक्षम्य व लाजिरवाणी असल्याचे मान्य करत यापुढे अशा चुका होऊ नयेत यासाठी अभ्यास मंडळांची पुनर्रचना करून त्यांच्यावर तज्ज्ञ व मान्यवर व्यक्तींची नियुक्ती करणार असल्याची माहिती दिली. पुढील दोन महिन्यांत ही अभ्यास मंडळे स्थापन करण्यात येतील, तसेच सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. चुकीच्या नकाशावर नवा नकाशा चिकटवण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.