आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला 2 मंत्रिपदे; राज्य मंत्रिमंडळ विस्तारास लागणार शुक्रवारपर्यंत मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पुणे येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असून सहकारी पक्षांना सत्तेत योग्य तो वाटा दिला जाणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी माध्यमांमध्ये विविध शंका-कुशंका उपस्थित केल्या जाऊ नयेत यासाठी त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त लाभला अाहे. भाजपची अलाहाबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक साेमवारी संपली. तेथून परतताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयाला अंतिम स्वरूप देणार असल्याची माहिती अाहे. नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला अाणखी दोन राज्यमंत्रिपदे दिली जाणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच चर्चा करणार आहेत, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्याने दिली.

गेले काही दिवस शिवसेना-भाजपमध्ये सोशल मीडियावर सुरू असलेल्या पोस्टर वॉरचा विस्तारावर काही परिणाम होणार नाही. सोशल मीडियावर कोणीही काहीही तयार करतो आणि पाठवतो, परंतु त्याचा युतीवर परिणाम होऊ नये याची काळजी दोन्ही पक्ष घेणार आहेत. एकमेकांना दुखावण्याऐवजी एकमेकांच्या सोबत राहूनच काम करावे, असे शिवसेना आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना वाटते. त्यामुळे सध्यातरी पोस्टर वॉर बंद होईल, अशी दाेन्ही पक्षनेत्यांना अाशा अाहे. फडणवीस सरकार सत्तेवर अाल्यापासून महामंडळांवरील नियुक्त्यांचे वाटपही झालेले नाही. भाजपचे मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपदाएेवजी महामंडळांचे अध्यक्षपद देण्यात येतील, असेही म्हटले जात आहे. विनोद तावडे यांच्यावर विधान परिषद सभागृह नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडील वस्त्रोद्योग आणि पणन ही खाती नव्या मंत्र्यांना दिली जाऊ शकतात, तर यापूर्वी एकनाथ खडसेंकडे असलेल्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी अाता राजकुमार बडोले यांच्याकडे सोपवण्यात येण्याची शक्यता अाहे.

राम शिंदेंना बढती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी अलाहाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली असून नावांची यादी मंजूर करून घेतली आहे. राज्यमंत्री राम शिंदे यांची कॅबिनेट मंत्रिपदी बढती करण्यात येणार असून त्यांच्यासह ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आणखी काही खात्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...