आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार आमदारांना थेट कॅबिनेटची लाॅटरी, एकाच राज्यमंत्र्याला बढती, खातेवाटप आज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ िवस्तारात धक्कातंत्र वापरले नसले तरी मोदींचा आदर्श घेत त्यांनीही राम शिंदे या एकाच राज्यमंत्र्याला बढती देऊन कॅबिनेट मंत्री केले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ६ आमदारांपैकी चौघांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाचीच लाॅटरी लागली आहे.
फडणवीस सरकारच्या या दुसऱ्या विस्तारात कोणाकोणाचा शपथविधी होणार हे तर आधीच जाहीर झाले होते; मात्र, भाजप आणि मित्रपक्षांच्या कोणकोणत्या आमदारांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळणार आणि कोणाला राज्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागेल याविषयी गुप्तता पाळली गेली होती. सकाळी विधिमंडळाच्या सभागृहात शपथविधी झाला तेव्हा ६ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यात राज्यमंत्री राम शिंदे यांचाही समावेश होता. अन्य पाच जणांमध्ये पांडुरंग फुंडकर हे मंत्रिपदाचा अनुभव असलेले आमदार वगळले तर जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख आणि महादेव जानकर यांचा समावेश आहे. ते पहिल्यांदाच मंत्री होत असून थेट कॅबिनेटमध्येच त्यांचा समावेश झाला आहे. महादेव जानकर तर आमदारही पहिल्यांदाच झाले आहेत.

शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत तर भाजपचे रवींद्र चव्हाण आणि मदन येरावार या ५ आमदारांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला आहे. मंत्रिमंडळातील पंकजा मुंडे या विदेशात गेल्या असल्याने त्या शपथविधीच्या वेळी उपस्थित नव्हत्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील समारंभाला आले नाहीत.

राज्याच्या मंत्रिमंडळात मर्यादेपेक्षा चार मंत्री कमीच
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कायदेशीर मर्यादा ४३ मंत्र्यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता ही संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळे आणखी चार जणांना ते मंत्रिमंडळात घेऊ शकतात. मंत्रिमंडळात काही पदे रिक्त ठेवून असंतुष्टांना मंत्रिपदाचे गाजर देण्यासाठी वापरण्याचे तंत्र राजकारणात सर्वच मुख्यमंत्री वापरत आले आहेत. फडणवीसांनीही त्यासाठीच ही पदे रिक्त ठेवली असण्याची शक्यता आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना क्लीन चिट मिळाल्यावर मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन हा त्याच राजकारणाचा भाग असू शकताे.

ठाकरेंनी खरा केला शब्द!
वृक्षारोपण मोहिमेच्या उद््घाटनप्रसंगी भाजपला खांद्याला खांदा लावून चालण्याचा दिलेला शब्द लगेच ‘खरा’ करून दाखवण्याची वेळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आली. शिवसेनेत नेत्यांचा असलेला अंतर्गत दबाव पाहून डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेच्या वाघाला मंत्रिमंडळ विस्तारात मात्र भाजपसमोर नांगी टाकावी लागली.
अशी आहे विभागनिहाय आमदार व मंत्र्यांची संख्या
मुंबई ३६ अामदार ८ मंत्री
कोकण ३९ अामदार २ मंत्री
मराठवाडा ४६ अामदार ४ मंत्री
उत्तर महाराष्ट्र ३५ अामदार ४ मंत्री
विदर्भ ६२ अामदार ८ मंत्री
पश्चिम महाराष्ट्र ७० अामदार १३ मंत्री
खडसे, मेटेंनी पाठ फिरवली : एकनाथ खडसे व शिवसंग्रामाचे विनायक मेटे फिरकले नाहीत. मेटेंनी भाजपवर फसवणुकीचा अाराेप केला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, फसणवीस सरकारचे या मागील 'राजकारण'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...