आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याला दोन लाल दिवे? मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य मंत्रिमंडळ विस्तार दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि खान्देशातील एक-एक आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. विस्तारात दहा जणांची वर्णी लागेल. शिवसेनेला दोन मंत्रिपदे दिली जाणार असून महादेव जानकर, राजू शेट्टी आणि रामदास आठवलेंच्या रिपाइंला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ मंत्र्याने दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत नुकतेच सूतोवाच केले होते.

विस्तारात भाजपच्या वाट्याच्या मंत्रिपदांपैकी मराठवाडा, खान्देश, पश्चिम विदर्भ, मुंबई पुणे वा सांगलीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळणार आहे. तसेच शिवसेनेच्या वाट्यातील दाेनपैकी एक मंत्रिपद मराठवाड्याला मिळणार असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले अाहेत. त्यामुळे सध्या दाेन कॅबिनेट मंत्रिपदे असलेल्या मराठवाड्याच्या वाट्याला लवकरच अाणखी दाेन ‘लाल दिवे’ मिळण्याची शक्यता आहे.

नव्या विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचेही बोलले जात होते. याबाबत हे मंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासाठी नोव्हेंबर २०१५ रोजीच अमित शहा यांनी परवानगी दिली होती. मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासही त्याच वेळेस सांगितले होते. त्यानुसार मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात अाला. हे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वाट्याची दोन मंत्रिपदे असून ती दोन्ही राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेली असतील किंवा एक कॅबिनेट एक राज्यमंत्री अशीही ही पदे असू शकतात. त्यानंतर अन्य सहकारी पक्षांना तीन मंत्रिपदे दिली जातील.

मंत्रिपद काढून घेणे शक्य नाही...
सध्या एका मंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. नवीन मंत्री येणार असल्याने काही खाती त्यांना द्यावीच लागतील. कोणत्या मंत्र्याकडील कोणती खाती कमी करायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. एखाद्या मंत्र्याचे मंत्रिपद काढून घेण्याबाबत इतक्यात निर्णय शक्य वाटत नाही. मात्र, दोन वर्षांनंतर आढावा घेऊन खातेपालट होऊ शकतो, असे संबंधित ज्येष्ठ मंत्री म्हणाले.