आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ IAS अधिकारी सुनील सोनी यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी सुनील सोनी यांचे आज सकाळी नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील आंतरराज्य परिषद सचिवालयात सध्या ते सचिवपदी कार्यरत होते. सुनील सोनी यांच्या निधनाने देशाच्या प्रशासनाने महाराष्ट्र केडरचा एक निर्भीड व अभ्यासू अधिकारी गमावला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र केडरमधील 1981 च्या बॅचचे IAS अधिकारी असणारे सोनी मूळचे मध्य प्रदेशचे रहिवाशी होते. त्यांनी नागपूर विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी तसेच वेस्टर्न सिडनी विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतली होती. भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी विदर्भ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपली प्रशासकीय कारकीर्द सुरू केली. राज्य प्रशासनात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त, नगरपालिका प्रशासनाचे संचालक, वित्त विभागाचे प्रधान सचिव (सुधारणा), नियोजन विभागाचे प्रधान सचिव आदी प्रमुख पदे भूषविल्यानंतर ते केंद्र सरकारात प्रतिनियुक्तीने कार्यरत होते. त्यात कोळसा मंत्रालयात उप सचिव व संचालक तसेच वित्त मंत्रालयात अतिरिक्त सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. नुकतीच त्यांची गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील आंतरराज्य परिषद सचिवालयात सचिव म्हणून नियुक्ती झाली होती.

निर्भीड अधिकारी गमावला– मुख्यमंत्री

सोनी यांनी आपल्या प्रशासकीय कारकि‍र्दीत नगरपालिका प्रशासन विभाग तसेच वित्त विभागात दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्य करणारे अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. त्यांच्या निधनामुळे प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

तर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सोनी यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाल्याचे म्हटले आहे. सोनी यांच्या आकस्मिक निधनाने मला धक्काच बसला आहे. गेली 34-35 वर्षे माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. त्यांच्या कारकि‍र्दीची सुरुवातच माझ्यासमोर झाली. मी पुसद (जि. यवतमाळ) येथे 1981 साली सहायक जिल्हाधिकारी असताना सोनी हे तेथे प्रशिक्षणार्थी म्हणून आले होते. एक तरुण, तडफदार अधिकारी म्हणून त्यांच्या कारकि‍र्दीची सुरुवात झाली. मी विक्रीकर आयुक्त असताना विभागाचा संगणकीकरण करण्याचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतला गेला. त्यावेळी ते वित्त विभागात सचिव (सुधारणा) हे पद सांभाळत होते. माहिती व तंत्रज्ञान विषयाबद्दल त्यांना प्रचंड आवड होती. दरम्यान, महाराष्ट्र आयएएस असोसिएशनतर्फे सोनी यांच्या निधनामुळे एका शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन यांच्या सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात सोमवारी (15 जून) सायंकाळी 5 वाजता ही शोकसभा होईल.
बातम्या आणखी आहेत...