आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडी-मालेगावात काँग्रेस, पनवेलमध्ये फुलले भाजपचे कमळ; शिवसेनेला भोपळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ मालेगाव - पनवेल महापालिकेत अपेक्षेप्रमाणे भाजपचे कमळ फुलले असून भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेत मात्र भाजपचा सपाटून पराभव झाला. भिवंडी आणि मालेगाव महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवत सत्तेच्या चाव्या स्वत:कडे राखण्यात काँग्रेसला यश आले आहे.
 
भिवंडीत मात्र भाजपला आपली सारी ताकद पणाला लावूनही काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात यश मिळवता आले नाही. मालेगावात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मुस्लिम कार्ड खेळले, मात्र तेही सपशेल अपयशी ठरले आहे. पनवेलमध्ये  ७८ पैकी भाजपने  ५१ जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवले.   

शेतकरी कामगार पक्षाने २३ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळवला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कशाबशा प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.  भिवंडी-निजामपूर महापालिकेत ९० पैकी ४७ जागा मिळवत काँग्रेसने सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसकडून सत्ता खेचून घेण्यासाठी विशेष जाेर लावला होता. मात्र त्यांना १९ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या. समाजवादी पक्ष २ जागांवरच राहिला. कोणार्क विकास आघाडी तसेच आरपीआयने प्रत्येकी ४ जागा मिळवल्या. मोठी ताकद असलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप व शिवसेना युती करून लढली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.

शिंदेंचा फौजफाटा उतरवूनही पनवेलात शिवसेनेला भोपळा
भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेेेने  पनवेलमध्ये  ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बळावर निवडणूक लढवली. शिंदेंंनी ठाण्यातील फौजफाटा पनवेलमध्ये उतरवला खरा, पण त्यांना आपल्या पक्षाच्या स्थानिक ताकदीची साथ न मिळाल्याने त्यांचे प्रयत्नही शेवटी तोकडे पडले.

वर्चस्वासाठी केली आघाडी, तरी शेकापची पीछेहाट
पनवेल मनपाच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप व  शेकापमध्ये निकराची झुंज होती. मात्र माजी खा. रामशेठ ठाकूर व त्यांचा मुलगा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या जयंत पाटलांची डाळ शिजू दिली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करूनही शेकापला फायदा झाला नाही.

मालेगावात भाजपचे मुस्लिम कार्ड फेल
मुस्लिमबहुल मालेगाव महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मुस्लिम कार्ड खेळत १७ उमेदवार दिले. मात्र मतदारांनी भाजपला नाकारले. ८४ पैकी भाजपला फक्त ९ जागा मिळाल्या. २८ जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. २० जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर १३ जागा मिळवून शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या निवडणुकीत एमआयएमला ७ तर जनता दलाला ५ जागा मिळाल्या. विद्यमान महापौर हाजी महंमद इब्राहिम यांचा पराभव झाला.

पुढील स्‍लाइडवर वाचा, तिन्ही महापालिकांचे पक्षीय बलाबल...

हे ही वाचा..
बातम्या आणखी आहेत...