मुंबई - दिल्लीत गेल्या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हटाव मोहिमेतून आता शह-काटशहाच्या बातम्याही समोर यायला लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेन तर आधी भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्या अजित पवार तसेच नुसतीच तोंडपाटीलकी करणार्या गृहमंत्री आर.आर.पाटील यांना बदलण्याचे धाडस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून दाखवावे. मग मीसुद्धा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडायला तयार आहे, असा आक्रमक पवित्रा चव्हाणांनी पक्षश्रेष्ठींसमोर दाखवल्याची महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. पृथ्वीराजांच्या काळात आघाडी सरकारचा कारभार थांबला आहे. कुठल्याच महत्वाच्या फाईलींवर सह्या होत नाहीत. लोकांची कामे होत नसल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारला बसू शकतो, असे पवारांनी अहमद पटेल, ए.के.अँटोनी यांच्या कानावर टाकले. या दोघांनीही काँगे्रस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना भेटून पवारांची ही भावना बोलून दाखवली. या सार्याचा परिणाम होऊन मुख्यमंत्र्यांची गच्छंती होणार, असे शनिवारी संध्याकाळपर्यंत वाटत होते. पण मुख्यमंत्र्यांनीही आपली बाजू समर्थपणे मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराचा पाढा पक्षश्रेष्ठींसमोर वाचला, अशी माहिती सुत्रांनी दिली.
राज्यात 15 वर्षे आघाडीचे सरकार असून त्यात बहुतांशी वर्षे अजित पवारांकडे जलसंपदा खाते होते. सुनील तटकरेंकडे हे खाते काही वर्षांपूर्वी आले असले तरी तटकरे हे अजितदादांना विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही. सिंचनातील हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघड होत असताना अधिकार्यांवर ठपका ठेवून अजितदादा व तटकरे नामोनिराळे झाले आहेत. मात्र चितळे समितीचा अहवाल तसेच कॅगच्या रिपोर्टमधील ताशेरे पाहता या भ्रष्टाचारामागे राज्यकर्त्यांचा हात असल्याचे दिसून आले आहे. संथ कारभारापेक्षा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या या भ्रष्टाचाराचीच राज्यातील लोकांमध्ये नाराजी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना पटवून दिले, असे सुत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये, राज्यात कायद्याचा बोजवारा