आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra CM Fadnavis Reviews Status Of Key Depts

बिनखात्याच्या मंत्र्यांची 5 तास बैठक, ‘गतिमान प्रशासना’चे 13 दिवस बिनकामाचेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस सरकार निर्णयच घेत नाही, त्यांच्या ढिम्म प्रशासनामुळे महाराष्ट्राची पीछेहाट झाली, अशी हाकाटी पिटत गतिमान प्रशासनाची हमी देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला खरा; पण १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल चौदा दिवस बिनकामाचेच गेले. भाजपने सरकार स्थापनेसाठीच बारा दिवस लावले आणि आता शपथविधीला ३६ तास उलटले तरीही खातेवाटपही केले नाही. त्यामुळे मोदींच्या भाजपचे हेच का गतिमान शासन, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडू लागला आहे.

काँग्रेस सरकार निर्णयच घेत नाही, फायलींवर बसून राहते, अशी टीका भाजपने नेहमीच केली. निवडणूक प्रचार काळातही हाच मुद्दा पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने काँग्रेसविरुद्ध रान उठवले होते. मात्र तोच भाजप सत्तेत बसल्यावर लगेचच खातेवाटपही करू शकला नाही. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बिनखात्याच्या मंत्र्यांची पाच तास बैठक झाली. अशा बैठकांनंतर पत्रकार परिषद घेण्याची फडणवीसांची घोषणाही २४ तासातच हवेत विरली. शपथविधीनंतर मंत्र्यांना खातेवाटप होते व ते मंत्रालयातील आपापल्या दालनांमध्ये बसतात, असा आजवरचा शिरस्ता. मात्र खातेवाटप न झाल्याने हे मंत्री मंत्रालयाकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे मोदी आणि भाजपचे गतिमान प्रशासनाचे आश्वासन संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

पांडुरंगाची पूजा खडसेंच्या हस्ते
कािर्तक एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. मात्र फडणवीस यांच्या सरकारात सध्या उपमुख्यमंत्री नसल्याने हा मान वरीष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देण्यात आला आहे.

एकटे मुख्यमंत्रीच सक्रिय, बाकी सगळेच मंत्री मूकदर्शक
शिवसेनेसोबतची मंत्रिपदाची बोलणी पूर्ण होईपर्यंत राज्यातील सर्वच मंत्री बिनखात्याचे राहतील असे चित्र आहे. राष्ट्रपती राजवटीत दीड महिना सरकार आणि प्रशासन दोन्हीही सुस्त झाले असताना सचिवांना स्पष्ट आदेश देण्याचे अधिकारच मंत्र्यांना नसल्याने सध्या केवळ एकटे मुख्यमंत्रीच राज्याचा कारभार हाकत असल्याचे आणि उर्वरित सर्व मंत्री केवळ मूकदर्शक बनले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जुनीच माहिती, नवे सादरीकरण
मंत्रालयात बसून राज्याचा कारभार हाकण्याऐवजी मंत्र्यांनी तब्बल पाच तास सह्याद्री अतिथिगृहावर खलबते केली. भाजप सरकारच्या दुसर्‍या कॅबिनेटसमोर अर्थ, गृह, ऊर्जा व कृषी या विभागाच्या सचिवांनी सादरीकरण केले. त्यातील बहुतेक माहिती आर्थिक सर्वेक्षणात सादर झालेलीच होती. या विभागांची सद्य:स्थिती, त्यातील त्रुटी व उपाययोजनांवर चर्चा होऊन यासंदर्भात उपाययोजनांविषयी अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

(फोटो : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसह दर्शन घेतले)