आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra CM Pruthviraj Chavan News In Marathi, Gandesh Festival

बाप्पाला साकडे: जनतेला भरभराट दे अन‌् आम्हाला निवडणुकीत यश!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोट्यवधी भक्तांप्रमाणेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या घरी शुक्रवारी श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. ‘राज्यातील दुष्काळाचे सावट हटवून, जनतेची भरभराट होऊ दे’ असे साकडे गणरायाला घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. दुसरीकडे, त्यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांनी ‘आगामी निवडणुकीत यश मिळू दे’, यासाठी बाप्पाला (खासगीत) साकडे घातले, नवसही बोलल्याचे सांगितले जाते.

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच त्यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छाही दिल्या. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी माझगाव येथील अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची सहकुटुंब पूजा केली. दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टीपासून राज्यातल्या जनतेचे संरक्षण कर, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याही घरी दहा दिवसांचा गणपती असतो. या निमित्ताने मुले नातवंडे असा संपूर्ण परिवार एकत्र येत असल्याचे जोशींनी सांगितले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही मुंबईतल्या पाली हिल यथील निवासस्थानी सहकुटुंब गणेशाची पूजा केली. या वेळी त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.

ठाकरे कुटुंबीयांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जात नसला तरी पहिल्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर आणि नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या घरच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. तर िशवसेनेचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी ताडदेवच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना करून पुजाही केली.

अशोक चव्हाणांच्या घरी तीन मूर्तींची पूजा
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गिरगावातल्या घरी जेजुरीच्या खंडेरायाच्या रूपातल्या श्रीची प्रतिष्ठापना केली. वडील शंकरराव चव्हाण यांनी सुरू केलेली ५० वर्षांपासूनची ही प्रथा असल्याचे ते म्हणाले. चव्हाण यांच्या घरी गेल्या काही वर्षांपासून गणेशाच्या तीन मूर्तींचे पूजन केले जाते. याचे कारण सांगताना चव्हाण म्हणाले की, ‘माझ्या दोन मुली आपापल्या आवडीचे आणखी दोन गणपती आणत असल्याने ही एक नवीनच प्रथा सुरू झाली आहे.’
(फोटो: ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक गणरायाची प्रतिष्ठापना केली.)