आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Collaborates With Israel On Smart Cities

नाशिक, अाैरंगाबादला ‘स्मार्ट सिटी’ बनवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील नागपूर, मुंबई, अमरावती औरंगाबाद आणि नाशिक ही शहरे इस्रायलच्या सहकार्याने स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिली. मुख्यमंत्री चार दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी तेल अविवचे महापौर रान हुल्दाई यांच्याशी संयुक्त भागीदारीबाबत चर्चा केली.

औद्योगिक विकासात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणातही सातत्याने वाढ होत असल्याने शहरांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी तेल अविव या शहरात स्मार्ट सिटीची संकल्पना आणि त्याबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. शहरांचा सुनियोजित विकास साधण्यासाठी तंत्रज्ञान, समाजमाध्यमे, लोकसहभाग आणि ई-गव्हर्नन्स यांच्या मदतीने राज्यातील मोठ्या शहरांना स्मार्ट सिटीमध्ये विकसित करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली.

इस्रायलमधील तेल अविव हे शहर ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१४’मध्ये जगातील सर्वात ‘स्मार्ट सिटी’ म्हणून गौरवले गेले आहे. या शहरात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. तसेच शहरांसमोरील संयुक्त आव्हाने आणि उपाययोजना, स्मार्ट शहर उपाययोजनेत भारतीय माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, अानुषंगिक कार्यक्रम राबवण्यासाठी लागणारे तज्ज्ञ, तंत्रज्ञान आणि उपाययोजना आदींबाबत सहकार्य करण्याचे दाेन्ही देशांमध्ये ठरवण्यात अाले. असे अादर्श शहर महाराष्ट्रातच उभारण्याचा संकल्प फडणवीस यांनी बाेलून दाखवला.
सुरक्षेला प्राधान्य
महापालिकेकडून ऑनलाइन सेवा, माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक आणि वाहनतळ व्यवस्थापन, नागरी सुरक्षा आणि सेवा, शहरांच्या विकासाला प्रोत्साहन, हरित बांधकाम आणि शहरातील जमिनीचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्वोत्तम उपाययोजनांचा उपयोग याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘वाॅर रूम’ची पाहणी
मुख्यमंत्र्यांनी इस्रायलचे माजी पंतप्रधान यित्झॅक राबिन यांच्या स्मारकाला भेट दिली. या वेळी तेल अविवचे महापौर रान हुल्दाई उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी वॉर रूमलाही भेट देऊन संपूर्ण शहरावर देखरेख करणाऱ्या यंत्रणेची पाहणी केली. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा व आपत्कालीन यंत्रणेची माहिती घेतली. यासोबतच मध्य-पूर्वेतील सर्वात मोठे शिंडर कॅन्सर हॉस्पिटल, तेल अविव विद्यापीठासह चेक पॉइंट व वेटिंट या सायबर कंपन्यांना भेटी दिल्या. तसेच तेल अविव विद्यापीठाचे प्रा. इराड यांच्याशीही चर्चा केली.