आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांची तिकिटे कापण्यासाठीच काँग्रेसकडून ‘प्रायमरीज’चे अस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी वर्धा आणि लातूर येथे काँग्रेस उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत निवडणूक (प्रायमरीज) घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी जाहीर केल्याने आश्चर्य वर्तवले जात आहे. उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पक्षातील दिग्गजांचे तिकीट कापण्यासाठीच ही खेळी खेळली जात असल्याचीही शंका आता उपस्थित केली जात आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या संकल्पेनला राज्यातील नेत्यांकडूनच तीव्र विरोध होत आहे.
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांनी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे, तर लातूरमधून प्रसिद्ध अर्थतज्ञ्ज आणि नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव हे इच्छुक आहेत. मात्र, या दोन्ही मतदारसंघांत प्रामाणिकपणे पक्ष पातळीवर मतदान घेण्यात आले तर या दोन्ही उमेदवारांचा पराभव होऊ शकतो आणि त्यामुळे पर्यायाने त्यांना तिकीट नाकारले जाऊ शकते.
टोकस या विवाहानंतर नवी दिल्लीत स्थायिक झाल्या असल्या तरी त्यांचा वर्धा मतदारसंघात नियमित संपर्क आहे. प्रभा राव यांची पुण्याई, पक्षनिष्ठा या बळावर आपल्याला तिकीट मिळेल, असा विश्वास त्यांना वाटत होता. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सचिव असलेल्या टोकस यांची पक्षश्रेष्ठींसोबत ऊठबस आहे.
मुलासाठी माणिकरावांची खेळी
यापूर्वी यवतमाळ मतदारसंघात ‘प्रायमरीज’द्वारे उमेदवार निवडीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या मतदारसंघात माणिकराव ठाकरेंना आपले पुत्र राहुल यांना तिकीट द्यावयाचे आहे. यासाठी त्यांनी नेते- कार्यकर्त्यांकडे तशी ‘फील्डिंग’ही लावून ठेवली आहे. ठाकरेंच्या दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असल्याने राहुलला तेथून विधानसभेत पाठवणे अशक्य आहे. त्यामुळे राहुलचा राजकीय प्रवास सुकर होण्यासाठी माणिकरावांना ‘लोकसभे’चाच मार्ग योग्य वाटतो. मात्र, कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडताना अडचण येऊ नये म्हणून त्यांनी ‘यवतमाळ’चे नावच या योजनेतून वगळले.
मेघे पिता-पुत्रांची चिंता वाढली
महिलांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. हाच धागा पकडून टोकस यांनी राहुल गांधी यांच्याकडे वर्ध्यातून उमेदवारी मागितली आहे. दुसरीकडे वर्ध्याचे विद्यमान खासदार दत्ता मेघे यांनी आपले पुत्र सागर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मेघेंचा दांडगा जनसंपर्क आणि खर्च करण्याची ऐपत यामुळे राज्यातील नेत्यांना ते ‘पात्र’ उमेदवार वाटतात. मात्र, पक्षश्रेष्ठींशी जवळीक असलेल्या टोकस यांच्या दावेदारीमुळे मेघेंची चिंता वाढली आहे.
नरेंद्र जाधव यांना विरोध
लातूर मतदारसंघात नरेंद्र जाधव यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असल्याने त्यांना निवडून आणण्याचेही पक्षासमोर आव्हान आहे. जाधव यांच्याऐवजी विलासरावांचे पुत्र आमदार अमित देशमुख किंवा अन्य स्थानिक उमेदवार रिंगणात असावा, अशी राज्यातील नेत्यांची अपेक्षा आहे. मात्र, जाधव यांच्या नावाला थेट विरोध करणे शक्य नसल्याने या मतदारसंघातही ‘प्रायमरीज’चा घाट घालण्यात आला आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे हे येथील काँग्रेसचे प्रबळ उमेदवार मानले जातात. पक्षांतर्गत निवडणूक झाल्यास जाधव यांचा पत्ता सहजपणे कापला जाऊ शकतो, असे गणित यामागे आहे.
निवडणूक नकोच : टोकस
प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांनी मात्र वर्ध्यात मतदानाद्वारे उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला विरोध केला आहे. ‘वर्धा जिल्ह्यातील 310 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 23 मार्च रोजी होणार आहेत. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत ही संख्या 66 टक्के आहे. पक्षाची सर्व यंत्रणा यासाठी कामी लागली आहे. सरपंच हे लोकसभा निवडणुकीनंतर निवडले जातील. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. म्हणून येथील ‘प्रायमरीज’ रद्द करण्यात यावी,’ अशी मागणी टोकस यांनी केली आहे.