आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसकडून 'अच्छे दिन'ची पुण्यतिथी, मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आंदाेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला २६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस सरकारच्या "अच्छे दिन'ची पुण्यतिथी म्हणून ‘साजरा’ करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदींनी जनतेची साफ निराशा केली आहे. सत्तेत येण्यापूर्वी भरमसाठ आश्वासने दिली खरी, पण ती पूर्ण काही केलेली नाही. अच्छे दिनचे आश्वासन कागदावरच राहिले. याचा भंडाफोड करण्यासाठी काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. २६ मे राेजी राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातून टोल हद्दपार करू, महागाई कमी केली जाईल, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून शेतकर्‍यांच्या कृषीमालाला योग्य भाव देऊन त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, अशी आश्वासने मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिली होती. मात्र, त्यातील एकही आश्वासन सत्यात उतरलेले नाही. राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असताना सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मोदी सरकारचे हेच का ते ‘अच्छे दिन' म्हणून आम्ही या सरकारची पुण्यतिथी साजरी करणार आहोत, असे चव्हाण म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकार कुचकामी
राज्यातील फडणवीस सरकार तर मोदी सरकारपेक्षा फारच कुचकामी ठरले आहे. या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. भाजप व शिवसेनेचे युती सरकार असूनही त्यांच्यात समन्वय तर नाहीच, शिवाय प्रशासनावरही या सरकारचा अंकुश नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांची सहा महिन्यांतच िनराशा झाली. फडणवीस बोलतात खूप, पण प्रत्यक्षात निर्णय घेण्याची त्यांच्यात ताकद दिसत नाही. सरकार चालवण्याची ही एक कला असते. विरोधात असताना टीका करणे सोपे असते, पण प्रत्यक्ष सत्तेत आल्यानंतर आपली क्षमता नसल्याचे दिसते. हीच अवस्था फडणवीस सरकारची झाली आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी या वेळी केली.

मान खाली घालून शिवसेना सत्तेत
‘शिवसेना मान खाली खालून फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी झाली आहे. भाजपचे नेते काहीएक िकंमत देत नसतानाही शिवसेनेचे मंत्री गप्प बसून सत्तेचा ‘आस्वाद’ घेताना दिसतात. राज्यातील जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंुबई, ठाण्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जाऊन येथील भूमिपुत्रांवर अन्याय होत असताना शिवसेेना पक्ष व त्यांचे नेते कसे काय गप्प बसले? त्यांचा भूमिपुत्रांचा पुळका आता कुठे गेला?. सत्तेचा मोह असल्याने त्यांनी डोळ्यावर झापडे बांधली असावीत’, अशी टीका चव्हाणांनी केली.

राष्ट्रवादीत पवारांचे काेणी ऐकत नाही
शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी त्यांनी घेतलेले निर्णय राष्ट्रवादीचे नेते ऐकत नाही. पवार एक सांगतात आणि अजित पवार, सुनील तटकरे दुसरेच करतात. एकूणच राष्ट्रवादीत समन्वय दिसत नाही, असा टोलाही अशाेक चव्हाण यांनी एकेकाळच्या आपल्या मित्रपक्षाला लगावला.