आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ९१ लाख नवमतदारांचे मत ठरणार निर्णायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून १५ ऑक्टोबरला होणार्‍या मतदानाच्या वेळी राज्यात तब्बल ९१ लाख ८२ हजार युवक प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील एकूण मतदारांच्या सुमारे १२ टक्के मतदार हे पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदले गेले असून त्यांचे मतदान हे सत्तेत कोण बसणार हे ठरवण्यात निर्णायक ठरणार आहे.

राज्यात ३१ जुलैपर्यंत नोंद झालेल्या ८ कोटी २५ लाख ९१ हजार ८२६ मतदारांपैकी नवमतदारांची संख्या ही सुमारे ९२ लाखांच्या जवळ म्हणजेच सुमारे १२ टक्के अशी आहे. विधानसभेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या तयारीची माहिती दिली. ३१ जुलैपर्यंतच्या मतदार यादीत पुरुषांची संख्या ४ कोटी ३६ लाख २७ हजार ९५६ असून ३ कोटी ९६ लाख २ हजार ७९९ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ९० हजार ४०३ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर २२ लाख ६७ हजार मतदारांनी नव्याने नोंदणी केली आहे. ज्या मतदारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत आपली नावे नोंद करता येतील. लोकसभा निवडणुकीवेळी पुणे व मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांची नावे गायब झाली होती. हजारो लोकांच्या तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने हे प्रकरण गंभीरपणे घेत ९ ते ३० जूनदरम्यान विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार २२ लाख मतदारांना नव्याने आपली नोंद करता आली आहेत. यापैकी मुंबईतून १ लाख ९४ हजार, तर पुण्यातून २ लाख ६६ हजार मतदारांना यादीत आपले नाव समाविष्ट करता आले.

ज्या मतदारांनी आपली नावे नोंद केलेली नाहीत त्यांनी लवकरात लवकर यादीत आपले नाव समाविष्ट करावे. तसेच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याचीही तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन गद्रे यांनी केले.

औरंगाबादसह १३ मतदारसंघांत प्रथमच व्हीव्हीपॅड मशीन आपण ज्या उमेदवाराला किंवा पक्षाला मत दिले आहे ते अचूक आहे की नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅड (व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेलर) मशीनचा प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पहिला प्रयोग कोलकाता येथे झाला होता. त्यानंतर देशात नेहमीच्या ईव्हीएम मशीन्ससह अन्यत्र व्हीव्हीपॅड मशीन वापरण्यात आली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच व्हीव्हीपॅड मशीनचा प्रयोग १३ मतदारसंघांत करण्यात येणार आहे.

औरंगाबाद शहरात औरंगाबाद मध्य (मतदारसंघ क्रमांक-१०७), औरंगाबाद पश्चिम (अजा) (१०८), औरंगाबाद पूर्व (१०९) या मतदारसंघात, तर अमरावतीत अमरावती विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३८, अचलपूर (४२), नाशिकमध्ये नाशिक पूर्व (१२३), नाशिक मध्य (१२४), नाशिक पश्चिम (१२५), चंद्रपूर (७१), यवतमाळ (७८), वर्धा (४७), भंडारा (अजा)(६१), नगर २२५ या मतदारसंघात व्हीव्हीपॅड मशीनवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. या मशीनमुळे मतदाराला आपले मत आपल्या पसंतीच्याच उमदेवाराला गेले आहे याची खातरजमा मशीनमधील पेपरमध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याचे समाधान होऊन तो मतदार केंद्रातून बाहेर पडेल, अशी आशा गद्रे यांनी व्यक्त केली.

बीडची जनता दोनदा मतदान करणार!
गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने बीड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्याची तारीखही विधानसभेच्याच १५ ऑक्टोबरला निश्चित झाली आहे. त्यामुळे बीडकरांना एकाच दिवशी दोनदा मतदान करावे लागणार आहे. विधानसभेबरोबर लोकसभेसाठी आपले मत द्यावे लागेल. बीड लोकसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील व्यक्ती उभी राहिल्यास त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमदेवार देणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे वि. मुंडे असा मुकाबला रंगण्याची शक्यता आहे.