आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Election, Parties Confident Of Contesting Alone

विधानसभेचे वारे : आघाडीप्रमाणे युतीतही स्वतंत्र लढण्याची खुमखुमी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर / मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम घुमू लागताच राजकीय पक्षांना स्वबळावर लढण्याची जोरदार उबळ आली आहे. अर्थात स्वतंत्र लढण्याची भाषा करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीच मित्रपक्षांवर असा दबाव टाकला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर शुक्रवारी नगरच्या मेळाव्यात नवाच फंडा काढला. सर्वच जण स्वबळावर लढू, असा सल्ला त्यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेनेसह मनसेलाही दिला.

राष्ट्रवादीला 144 जागा मिळाल्या नाहीत तर राज्यातील सर्व 288 जागा लढवू, असा इशारा पवार यांनी काँग्रेसला दिला. दुसरीकडे, दमबाजी करणार्‍या राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भाजपच्या गुरुवारच्या पवित्र्यावर शिवसेनेनेही पदाधिकार्‍यांना थेट 288 जागांवर लढण्याची तयारी करा, असे फर्मान सोडले आहे.

भाजप : ताकद वाढली
प्रदेश पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात स्वबळावर लढण्याचा आग्रह झाला. शिवसेनेच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा मोदी लाटेचा फायदा घेत राज्यात स्वबळ आजमावून पाहू, अशी मागणी मधू चव्हाण, सुरजितसिंह ठाकूर, वर्षा भोसले आदी नेत्यांनी गुरुवारी केली.
कारण : एकदा तरी मुख्यमंत्रिपद मिळावे. संख्याबळाच्या जोरावर महायुतीचे नेतृत्व हाती घेण्याचा प्रयत्न.

राष्ट्रवादी : पुन्हा दमबाजी
अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षापेक्षा आमच्या जास्त जागा आल्या. आता विधानसभेत 144 जागा हव्यातच. अन्यथा सर्वच जागा लढवू. ममता बॅनर्जी स्वबळावर सरकार आणू शकतात, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी का नाही?
कारण : नेहमीचा फंडा. पराभूत काँग्रेसशी नाते तोडून पक्षाची ताकद आजमावून पाहण्याचा प्रयत्न.

काँग्रेस : राष्ट्रवादीची गुर्मी उतरवणार
राष्ट्रवादी काँग्रेस ऐनवेळी कोणता निर्णय घेईल, याची शाश्वती नसल्याने काँग्रेसने आतल्या आत राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये स्वबळाची तयारी चालवली आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र नियोजन करून स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, अशा स्पष्ट सूचना प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
कारण : ऊठसूट स्वबळाचा दम देणार्‍या राष्ट्रवादीला प्रत्युत्तर. सत्ता हवी असल्यास काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न.

शिवसेना : भाजपची खुमखुमी जिरवणार
भाजपची स्वबळाची खुमखुमी जिरवण्यासाठी 288 जागांसाठी तयार राहण्याचे पदाधिकार्‍यांना आदेश ‘मातोo्री’वरून निघाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड नाराज आहेत. शिवसेनेकडे सर्व जागांचा अहवाल तयार आहे. मतदारसंघात सेनेची स्थिती, विजयाच्या संधी, काय करायला हवे. प्रतिस्पध्र्याची ताकद किती, हे अहवालात असून ते विभागप्रमुख व जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
कारण : भाजपच्या भूमिकेला चोख प्रत्युत्तर देऊन ताकद दाखवून देणे. युतीत शिवसेनेचाच शब्द अंतिम हे ठसविण्याचा प्रयत्न.