तीन आघाड्यांची एकी, / तीन आघाड्यांची एकी, चार दिवसांत चित्र स्पष्ट होणार

प्रतिनिधी

Sep 11,2014 05:55:00 AM IST
मुंबई - "शेकाप'प्रणीत महाराष्ट्र डावी लोकशाही समिती, अॅड. प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट आणि न्या. पी. बी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील संविधान मोर्चा या तीन पुरोगामी आघाड्यांची एकच महाआघाडी बनवून काँग्रेस आघाडी महायुती या दोन्ही प्रस्थापित राजकीय गटांना विधानसभा निवडणुकीत टक्कर देण्याची रणनीती राज्यात सध्या आकार घेत आहे.

भाकप, माकप आणि शेकाप यांनी महाराष्ट्र डावी लोकशाही समिती बनवली आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची १३ छोट्या पक्षांची महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट लाेकसभेपासूनच अस्तित्वात आहे. त्यात बुधवारी नव्याने न्या. पी. बी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान मोर्चा या आणखी एका आघाडीची भर पडली आहे. अशा प्रकारे राज्यात सध्या वेगवेगळ्या तीन आघाड्या आहेत. या तिन्ही आघाड्यांचे एकत्रीकरण करून एकच महाआघाडी बनवावी, असे प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत. या आघाड्यांच्या नेत्यांची दोन वेळा बैठकही झाली आहे. तिसऱ्या बैठकीत महाआघाडी संदर्भात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत या महाआघाडीची घोषणा होऊ शकते.

संविधान मोर्चा
बुधवारी संविधान मोर्चा नावाच्या आघाडीची मुंबईत स्थापना झाली. त्यामध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा शिवराज्य पक्ष, न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांचा लोकशासन आंदोलन, हनुमंत उपरे यांचा सत्यशोधक ओबीसी परिषद आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आहेत.

आघाडीचे म्होरके
राज्यातील तीनही पुरोगामी आघाड्यांची महाआघाडी झाल्यास शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, भारिप बहुजन-महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिवराज्यचे अध्यक्ष बिग्रेडियर सुधीर सावंत यांच्या हाती या त्याची सूत्रे असतील.
X
COMMENT