आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदत देऊनही आत्महत्या वाढल्या, कारणे शोधण्यासाठी खास समिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली, कर्जे माफ केली, सवलतीत वीज दिली. शैक्षणिक शुल्क माफ करूनही शेतकर्‍यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? असा प्रश्न मंगळवारी कॅबिनेट बैठकीत उपस्थित झाला. त्यावर या आत्महत्यांच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्या वेळी रावते यांनी राज्य सरकार इतकी मदत देत असूनही शेतकरी आत्महत्या का करतात याचा विचार केला आहे का, असा सवाल केला. सरकारने शेतकर्‍यांची कर्जे माफ केली, सावकाराच्या कर्जातून मुक्ती दिली, सवलतीच्या दरात वीज दिली जात आहे, मुलांची शैक्षणिक फी माफ केली आहे, मग असे काय कारण आहे की ज्यामुळे शेतकरी अजूनही आत्महत्या करीत आहेत? आदी मुद्दे रावते यांनी उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मदतही पोहोचली : दुष्काळग्रस्तांनाराज्य सरकारने ४००० कोटींची मदत जाहीर केली. केंद्राकडून पैसे आले नाहीत तरीही सरकारने आपल्या तिजोरीतून मदत दिली. यावेळी दुष्काळग्रस्तांना कमीत कमी एक हजार रुपये तरी मिळतील याची काळजी घेतली आहे. अगोदरच्या दोन हजार कोटींच्या मदतीतून शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचेही रावते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
राज्यात वर्षभरात ७२४ आत्महत्या
दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे गेल्या वर्षात राज्यात ७२४ आत्महत्या झाल्या आहेत. संपूर्ण देशात ८३६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी ७२४ या महाराष्ट्रातील आहेत. विदर्भात डिसेंबर महिन्यात १२ तर जानेवारी महिन्यात २९ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवली. मराठवाड्यातही वर्षभरात ४२२ आत्महत्या झाल्या आहेत.

अभ्यासावर अभ्यास : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी यशदा व इंदिरा गांधी संशोधन संस्थेतर्फे राज्य सरकारने अभ्यास करवून घेतला होता. टाटा समाजविज्ञान संस्थेनेही २००५ मध्ये अभ्यास करून उच्च न्यायालयाला एक अहवाल दिला होता. त्या आधारावरच मनमोहन सिंग यांनी मदत दिली होती.

मराठवाड्यातील स्थिती : बीड-७७, नांदेड-४८, परभणी-३४, हिंगोली-१९, औरंगाबाद-२७, लातूर-१८, जालना-१५ आणि उस्मानाबाद-१४

कारण कळेना
मदत मिळूनही आत्महत्या का करतो ते कळत नाही. दुष्काळी भागाचा दौरा केला त्यात आम्हालाही कारण समजले नाही. - दिवाकर रावते, मंत्री
हमी भाव मागता? दुष्काळावर मदतही मागतात व कापसाला हमी भाव देण्याचीही मागणी शेतकरी कशी करतात, असे रावते यांनी म्हटले आहे.