मुंबई - राज्याच्या संभाव्य मुख्यमंत्र्यांचा जन्म हा जुलै महिन्यात झाला आहे आणि हे कोणी ज्योतिषाने केलेली भविष्यवाणी नाही... तर हा निव्वळ योगायोग आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सार्यांचा जन्म जुलैमधील आहे आणि तोही शेवटच्या आठवड्यातला.
लोकसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँँग्रेस आघाडीचा दारूण पराभव झाला. विधानसभा निवडणुकातही जनमत आघाडीविरोधात असून महायुती सत्तेवर येईल, अशी चर्चा आहे. सत्ताधारी मंत्र्यांनाही आघाडीचे सरकार पुन्हा येण्याची खात्री नाही. खुद्द नारायण राणे यांनीच काँग्रेस आघाडीला जेमतेम 80 जागा मिळतील, असे भाकीत केले आहे.
लोकसभेच्या वेळी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याला देशभर मोठा प्रतिसाद मिळाला. या धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही शिवसेना व भाजपही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्याच्या तयारीत आहे.
शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले असून उद्धव यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झाला, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ असा प्रचार करत फडणवीस यांच्या नावाचे घोडे पुढे दामटले होते. त्यांचा जन्म हा 22 जुलै 1970 मधील आहे. त्यांच्याप्रमाणे भाजपचे नेते विनोद तावडेही शर्यतीत आहे. ते फडणवीस यांच्यापेक्षा वयाने मोठेही आहेत.
तावडेंचा जन्म आहे तो 23 जुलै 1963. मुख्यमंत्रिपदाची संधी हातून जाऊ नये म्हणून तावडेंनी या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कायम मागच्या दाराने विधिमंडळात प्रवेश घेणार्या तावडेंनी थेट लोकांमधून निवडून येण्याची हिंमत दाखवली आहे. बोरिवली पश्चिम मतदारसंघामधून तावडे उभे राहणार आहेत.
अजित पवार सर्वांचे ‘दादा’
राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपणच मुख्यमंत्री कसे होऊ, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यावर त्यांचा भर आहे. त्यांचे काका व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनाही येनकेनप्रकारणी राज्यात तरी सत्ता हवी आहे.
अजितदादांप्रमाणे थोरल्या पवारांनीही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 चा असून ते मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमधील वयाने सर्वात मोठे असतील.
काँग्रेसच्या एकाही दावेदाराचा जन्म जुलैत नाही!
विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असून बाबांची जन्मतारीख आहे 17 मार्च 1946. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म आहे तो 28 ऑक्टोबर 1958 चा. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जन्म 10 एप्रिल 1952 चा असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची जन्मतारीख आहे 22 ऑगस्ट 1954.