आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारही लागले विधानसभेच्या तयारीला, लाभाच्या योजना जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेच्या पराभवाने धास्तावलेले राज्य सरकार आता धडाक्याने कामाला लागल्याचे दिसत आहे. राज्य सरकारचा कामगार विभाग बांधकाम कामगारांवर मेहेरबान झाला असून या कामगारांना काहीतरी भेटवस्तू देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. या भेटवस्तू खरेदीसाठी राज्यातल्या कामगार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या सुमारे पावणेदोन लाख बांधकाम मजुरांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर ज्येष्ठ घरगुती कामगारांनाही 10 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
आचारसंहिता शिथील झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतही याच मुद्दयावर भर देण्यात आला होता. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता कामगार विभागाने कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सुमारे 1 लाख 78 हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी 3 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या रकमेतून बांधकाम कामगारांनी 1 ब्लँकेट, 1 मच्छरदाणी, 2 चादरी, जेवणाचा डबा आणि चटई यासारख्या आवश्यक वस्तु खरेदी करायच्या आहेत. यासाठी एकूण 30 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ही रक्कम थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणीकृत अशा 3 लाख 21 हजार घरगूती कामगारांपैकी 55 वर्षे वयावरील ज्येष्ठ घरेलु कामगारांनाही प्रत्येकी 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.
कार्यकर्त्यांकडून मागणी
लोकसभेच्या पराभवानंतर दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी आढावा बैठका घेतल्या. जनतेसाठीच्या अप्रत्यक्ष लाभाच्या योजना राबवण्यापेक्षा थेट लाभ मिळेल अशा स्वरूपाच्या योजना राबवण्याची गरज या बैठकांतून व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आता प्रत्येक विभाग कामाला लागला असून कामगार विभागाने रोख रकमेच्या या योजना राबवल्याचे बोलले जात आहे.