आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Allocates 200 Acres For IIM In Mihan

IIM औरंगाबादमध्येच हवे या मागणीसाठी एकवटले मराठवाड्याचे सर्वपक्षीय आमदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- औरंगाबादकरांच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) मागणीला उतारा म्हणून स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (स्पा) संस्था देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केल्यानंतर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार त्याविरोधात एकवटले आहेत. आयआयएम औरंगाबादमध्येच हवे अशी भूमिका घेत सर्वपक्षीय आमदारांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन सादर केले. आयआयएम औरंगाबादहून हलविण्याचा विचार झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही सर्व आमदारांनी दिला आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यांत आयआयएम उभारण्याची घोषणा केल्यापासून ही संस्था औरंगाबादमध्येच व्हावी, असा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मागील दोन महिन्यात राज्यांत सत्तांतर झाले व नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस यांनी प्रतिष्ठित असे आयआयएम नागपूरला हलविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आयआयएम औरंगाबादमध्येच व्हावे यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने (सीएमआयए) विशेष पुढाकार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. भाजपच्या मराठवाड्यातील मंत्री आणि आमदारांनीही आयआयएम औरंगाबादमध्येच खेचून आणू, अशी ग्वाही दिली होती. मात्र, मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयएम ही संस्था नागपूरमध्ये पळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नागपूरला यापूर्वीच एम्म्स हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एम्सपाठोपाठ आयआयएमही नागपूरला नेण्याचे निश्चित केल्याचे पुढे येत आहे.
मुख्यमंत्र्यांची चाल लक्षात येताच आज सकाळी विधानसभेबाहेर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले. यात सत्ताधारी भाजप व शिवसेनेचेही आमदार सहभागी होते. याची तत्काळ दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या आमदारांची भेट घेतली. यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी एक संयुक्त निवेदन दिले व आयआयएम औरंगाबादमध्येच झाले पाहिजे अशी मागणी लावून धरली. यावेळी तावडेंनी औरंगाबादमध्ये आयआयएम व्हावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. आम्ही राज्यात संतुलित विकास करण्याला प्राधान्य देत आहोत त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आमचे सरकार घेईल असे तावडेंनी सांगितले. मात्र, त्यांनीही आयआयएम नागपूरला हलविणार नसल्याचे ठामपणे सांगू शकले नाहीत. दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआयएम या संस्थेसाठी नागपूरात जमीन निश्चित करण्यात आली असून, लवकरच या प्रकल्पाच्या इमारतीचे नागपुरात भूमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयआयएम नागपूरला नेण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची योजना असल्याचे 'दिव्य मराठी'ने 20 दिवसापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर औरंगाबादकरांनी या मागणीचा जोर आणखीनच वाढवला आहे. त्यासाठी लाक्षणिक उपोषणही करण्यात आले. सीएमआयए आताही औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे. या सर्व त्या दबावाचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबाद येथे स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किचेक्चर (स्पा) ही केंद्रीय संस्था देण्याची घोषणा सोमवारी विधिमंडळात केली. ही संस्थाही केंद्र सरकारचीच असून आयआयएम इतकीच प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे औरंगाबादकरांनी आयआयएमचा आग्रह सोडावा, असा संदेशच फडणवीस यांनी ही संस्था औरंगाबादसाठी जाहीर करून दिला आहे. मात्र, आता मराठवाड्यातील सत्ताधारी मंत्री, आमदारांसह सर्वांनीच औरंगाबादलाच आयआयएम झाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.
पुढे वाचा, औरंगाबादला आयआयएम होऊ शकेल?... आयआयएम पळविण्यावरून का होत आहे राजकारण...