आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Approves Z+ Security For Anna Hazare

अण्णा हजारेंभोवती आता CISF च्या 60 जवानांचे कडे, राज्य शासनाने पुरवली Z+ सुरक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना मिळणाऱ्या सततच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता अण्णा हजारे सीआयएसएफच्या 60 कमांडोजच्या कड्यामध्ये असतील. हे कमांडोज 24 तास त्यांच्या आसपास राहातील. कमांडोज एके-47 आणि इतर अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असतील.
अण्णा हजारेंना गेल्या दहा दिवसांमध्ये दोन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गुरुवारी देखील त्यांना धमकीचे पत्र मिळाले. अण्णा सध्या मोदी सरकारच्या विरोधात लढत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या भू-संपादन कायद्याला विरोध तर वन रँक वन पेंन्शन मागणीला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही प्रश्नांवर आंदोलनाचाही इशारा त्यांनी दिला आहे.

काय होते पत्रात
गुरुवारी मिळालेल्या पत्रात अण्णा हजारेंना मारण्याची सुपारी घेतली असल्याचे म्हटले आहे. त्यात लिहिले आहे, 'तुम्ही करत असलेली समाजसेवा मला आवडत नाही. मी अत्यंत क्रूर माणूस आहे. चांगले काम करणाऱ्यांना संपवणे हेच माझे काम आहे. यापुढेही मी ते करत राहाणार आहे. माझे काम पैसे घेऊन ठार करणे आहे. तुम्हाला आता हा दुसरा इशारा आहे. आता तुम्ही वाचणार नाही.'
आधीही मिळाल्या धमक्या
धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वतःला पुण्याचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे. याआधी पाठवण्यात आलेल्या पत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राक्षस म्हटले होते, त्यासोबतच त्यांची साथ सोडण्याचा इशारा दिला होता. पत्रात म्हटले आहे, की तुमची गत अंधश्रद्धेविरुद्ध लढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांप्रमाणेच होईल. विशेष म्हणजे गुरुवारी दाभोलकरांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली. अण्णा हजारेंना मिळालेल्या धमकीच्या पत्रानंतर महाराष्ट्र पोलिसांनी कलम 506 नुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फेसबुकवरुनही त्यांना याआधी धमकी दिली आहे.