आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Government Declared Aid Package To Vidarbh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओल्या दुष्काळाने पिचलेल्या विदर्भाला दोन हजार कोटींची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अतिवृष्टीच्या संकटात अडकलेल्या विदर्भातील अपाद्ग्रस्तांसाठी राज्य शासनाने बुधवारी 1 हजार 935 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भाला द्यावयाच्या मदतीबाबत विधान परिषदेत सविस्तर निवेदन केले. वैयक्तिक मदत, पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि कायम स्वरूपाच्या उपाययोजना अशी त्रिसूत्री या पॅकेजमध्ये आहे.


विदर्भ आणि कोकणातील अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याबाबत विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत 260 अन्वये चर्चा उपस्थित केली होती. त्याला गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले.
पॅकेजची विभागणी
हे पॅकेज 1 हजार 935 कोटी रुपयांचे आहे. यामध्ये वैयक्तिक नुकसानभरपाईला 375 कोटी, पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 720 कोटी आणि अतिवृष्टीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 840 कोटींची विभागणी दाखवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना या पॅकेजमुळे काहीसा दिलासा मिळेल असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


असे आहे पॅकेज
मोठ्या जनावरांसाठी 25, तर लहान जनावरांच्या मृत्यूपोटी 5 हजारांची मदत
पक्की घरे पडलेल्या घरमालकास 70 हजार, कच्च्या घरासाठी 25 हजार, तर अंशत: नुकसान झालेल्या घरांसाठी
15 हजार रुपयांची मदत वाहून गेलेल्या जमिनीला 25 हजार, खरडलेल्या शेतीस 20 हजार (हेक्टर)
औष्णिक प्रकल्पांची राखही पुराला कारणीभूत जागतिक तापमानातील बदल हे अतिवृष्टीचे प्रमुख कारण आहे. मात्र, विदर्भातील औष्णिक प्रकल्पांची राख नद्यांमध्ये येत आहे. त्यामुळे नद्यांची पात्रे उथळ होत असल्यामुळे नागरी वसाहतीत पाणी घुसत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.


‘गोसीखुर्द’ झाला असता तर पूर आला नसता
गोसीखुर्द हा विदर्भातील सर्वात मोठा जलप्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम पुनर्वसनामुळे रखडले आहे. आज गोसीखुर्द प्रकल्प कार्यन्वित असता तर पूर आला नसता, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. अतिवृष्टीमध्ये जाहीर केली जाणारी मदतीची रक्कम वर्षानुवर्षे एकरी 2 हजार आहे. ती वाढवण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या पांडुरंग फुंडकर यांनी केली. विदर्भाप्रमाणे कोकणासाठीही पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी विनोद तावडे यांनी या वेळी केली.


राज्यात अतिवृष्टीचे 237 बळी
अतिवृष्टीमध्ये राज्यात 237, तर विदर्भात 107 नागरिकांचा मृत्यू झाला. 960 मोठी, तर 987 लहान जनावरे वाहून गेली. 3,800 पक्की घरे पडली असून 36 हजार घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 4 लाख हेक्टर जमीन प्रभावित झाली आहे. 25,500 हेक्टर जमीन खरडून गेली असून 12 हजार हेक्टर जमीन वाहून गेली आहे. 5,577 कि. मी.ची रस्ते आणि 502 पुलांचे नुकसान झाले आहे. 1,920 घरांमधील वीज खंडित झाली असून 1, 420 शासकीय इमारतींचे मोठे नुकसान झाले.


केवळ दोन एकरपर्यंतच मदत
65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस आणि 50 पेक्षा अधिक नुकसान झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जाते. ओला दुष्काळ जाहीर केल्यास 90 टक्के मदत केंद्र सरकार देते. विदर्भात अतिवृष्टी आहे, पण ओला दुष्काळ नाही. मात्र, ओल्या दुष्काळाचे निकष बदलावेत, अशी मागणी राज्य शासन केंद्राकडे करणार आहे. विदर्भ पॅकेजमधील मदत प्रत्येक शेतक-याला 2 एकरांपर्यंत दिली जाणार असून हे पॅकेज म्हणजे नुकसानभरपाई नाही, तर मदत आहे, अशी पुष्टीही चव्हाण यांनी दिली.


महापालिकांना
100 कोटी

नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चार महानगरपालिकांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 100 कोटींचा निधी देण्यात येईल. हा निधी पॅकेजव्यतिरिक्त असेल. अतिवृष्टीवर वरवरचे उपाय करण्यासापेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. अशा उपाययोजना करण्यासाठी या मदतनिधीतील 840 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. त्यामधून मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी, सिमेंट नाल्यांसाठी 10 कोटी, नदी-नाल्यातील गाळ काढण्यासाठी 100 कोटी तसेच पूरसंरक्षक भिंतीसाठी 500 कोटींची रक्कम खर्च केली जाईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.