आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Declares 14,708 Villages Drought Hit

दुष्काळ जाहीर: मराठवाड्यासह राज्यात 14708 गावे दुष्काळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठवाड्यातील सर्वच ६८४२ गावांसह राज्यात १४,७०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. गावांत कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतसारा माफी देण्यात आली आहे.

शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याच्या निर्णयाबरोबरच कापूस, सोयाबीन, मका, धान खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत.
केंद्राच्या दुष्काळग्रस्त मदतीच्या नव्या निकषांप्रमाणे जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्यात येत असल्याचे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.

राज्यात १८९ तालुक्यांत जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. १४,७०८ गावांची नजर पैसेवारी ५० पेक्षा कमी, तर २५,३४५ गावांची पैसेवारी ५०च्या वर आहे. केंद्र सरकारकडे मदतीच्या मागणीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुधारित पैसेवारीची वाट न पाहता तातडीने मदतीचे ज्ञापन पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे खडसे यांनी सांगितले.

कापूस खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वाढत असल्यामुळे तातडीने कापूस खरेदी केंद्रांबरोबरच सोयाबीन, मका व धानाची खरेदी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांच्या (इबीसी) पाल्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देता यावी म्हणून उत्पन्नाची मर्यादा एक लाखावरून अडीच लाखांवर आणावी, वीज बिल न भरल्यामुळे बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे बील तातडीने भरावी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी बंद पाणी योजना तातडीने मार्गी लावाव्यात असे निर्णयही या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे खडसे म्हणाले.

मदत कधी?
हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. परंतु दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय केवळ औपचारिकता ठरू नये. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात व तातडीने भरीव मदत मिळाली पाहिजे. त्यासंदर्भातील अध्यादेश जारी झाले पाहिजेत.
- राधाकृष्ण विखे, काँग्रेस

गाव हाच घटक
प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी असल्याने दुष्काळ जाहीर करताना तालुक्याऐवजी गाव हा घटक ठेवून उपाययोजना होणार आहेत. या गावांत तातडीने दुष्काळी उपाययोजना होणार असून गरजेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्सही सुरू होणार आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, जिल्हानिहाय दुष्काळी गावांची संख्या