मुंबई - सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनावर राज्य सरकार लवकरच बंदी घालणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
जागतिक कॅन्सर दिनानिमित्त टाटा मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर फडणवीस म्हणाले की, तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि सिगारेटमुळे होणाऱ्या कॅन्सरमुळे एखाद्या व्यक्तीच्याच जीवनावर परिणाम होतो असे नाही तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनावर बंदी घालण्यात येईल आणि त्यासंदर्भात आवश्यक पावले उचलली जातील. कॅन्सरचा प्रादुर्भाव आजही २० वर्षांपूर्वीएवढाच आहे. त्यामुळे कॅन्सरबाबत जागृती करण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू आणि पानमसाला विक्री वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे. गृह आणि शिक्षण विभागांच्या मदतीने तंबाखू आणि पान मसाला विक्रीवरील बंदीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मोठा कर लादण्याचा विचार
पंजाब सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारला आहे. त्याचा परिणाम काय झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आम्हीही त्यावर विचार करू. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री