आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government To Make Law Against Dance Bar

फाइव्ह - थ्री स्टारमधीलही छमछम होणार बंद; डान्सबार बंदीसाठी नवा कायदा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डान्सबार बंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आग्रहामुळे पुन्हा एकदा नवीन कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. या कायद्यात फाइव्ह स्टार आणि थ्री स्टार हॉटेलमध्ये होणार्‍या डान्सवरही बंदी येणार आहे. याच अधिवेशनामध्ये तो संमत केला जाईल.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन उपस्थित होते. डान्सबार बंदीत सरकारने फाइव्ह स्टार हॉटेलना त्याची परवानगी दिल्याबद्दल न्यायालयाने टीका केली होती. यामुळे नवीन कायद्यामध्ये सरसकट डान्सबारवर बंदी घालण्याचे ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र त्यावर राज्याच्या महाधिवक्त्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळेही या नवीन कायद्याचा विचार गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे समजते.

वास्तविक, अशा पद्धतीचा कायदा केल्यास त्याचे कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमांवर दूरगामी परिणाम होतील, अशी भीती मुख्यमंत्री चव्हाण व संबंधित अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना वाटते आहे. मात्र डान्सबार बंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यामुळे आर. आर. पाटील यांना तो व्यक्तिगत पराभव वाटत असल्याने त्यांनी अशा प्रकारचा कायदा करावा, असा जोरदार आग्रह धरल्यामुळेच अखेर हा कायदा करण्याच्या निर्णयापर्यंत राज्य सरकारला यावे लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवलेल्या त्रूटी दूर करण्याकरिता राज्यातील पंचतारांकित व तीन तारांकित हॉटेल्समधील नृत्याच्या कार्यक्रमांवर ही बंदी येणार असून या व्यवसायातील नर्तकींच्या पुनर्वसनाचाही कार्यक्रम यात ठरविला जाणार आहे. मात्र या नव्या कायद्यामुळे पुढे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याने त्यापेक्षा 2004 साली याबाबत नेमलेल्या समितीने सुचविलेल्या उपाययोजना लागू केल्यास राज्यातील डान्स बारमध्ये चालणार्‍या बेधुंद प्रकारांना आळा बसू शकतो, असे गृह व विधी विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.


लोककला, सांस्कृतिक कार्यक्रमांना फटका
नव्या कायद्यामुळे तमाशासारख्या लोककलांचे कार्यक्रम कसे करायचे हा मोठाच प्रश्न उभा राहील. याचे दूरगामी परिणाम होतील, असे काँग्रेसच्याच एका मंत्र्याने सांगितले. खासगी संस्थांच्या पुरस्कार समारंभातील नृत्याच्या कार्यक्रमांनाही बंदीचा फटका बसू शकतो. भरतनाट्यम, कथ्थकली, ओडिसी आदी नृत्याच्या कार्यक्रमांवर कोणीही न्यायालयात जाऊन बंदीचा बडगा आणू शकते.