आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Governor Vidyasagar Rao News In Marathi

विद्यासागर राव यांनी स्वीकारली राज्यपालपदाची सूत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तेलंगणामधील भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच वाजपेयी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री राहिलेले ७३ वर्षीय चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शनिवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी राव यांना पदाची शपथ दिली.

या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. सर्वात लक्षणीय ठरली ती म्हणजे सी. जंगा रेड्डी यांची उपस्थिती. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची लाट उसळली होती. या लाटेवर स्वार होत काँग्रेसने आठव्या लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या या झंझावातात तेव्हा सोमनाथ चटर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक दिग्गज पराभूत झाले होते. मात्र, गुजरातेतील मेहसानाचे ए. के. पटेल आणि आंध्रतील हनमकोंडा येथील सी. जंगा रेड्डी हे भाजपचे केवळ दोनच खासदार त्या वेळी निवडून आले. सी. जंगा रेड्डी राव यांची घनिष्ठ मैत्री आहे. राव यांच्या शपथविधीस रेड्डी आवर्जून उपस्थित होते.
राव यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गिते, उपमुख्यमंत्री अजित पवार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील, सुरेश शेट्टी, भाजपचे वरिष्ठ नेते विजय गोयल, किरीट सोमय्या, बंडारू दत्तात्रेय, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख अनिल चोपडा वरिष्ठ शासकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. नोव्हेंबर महिन्यात भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याची संधी राव यांना मिळेल काय, अशीच चर्चा या वेळेस राजकीय नेत्यांमध्ये रंगली होती.